24 तास जलवाहिन्यांमुळे रस्त्यांची वाट
नव्याने केलेल्या काँक्रिटच्या रस्त्यांवरच विविध ठिकाणी खोदाई : रस्ते-पेव्हर्सची दुर्दशा : रस्त्यांसाठी खर्च केलेला लाखोंचा निधी वाया
बेळगाव : 24 तास पाणीपुरवठ्यासाठी घालण्यात येत असलेल्या जलवाहिन्यांमुळे शहरातील काँक्रिटच्या रस्त्यांची पूर्णपणे वाट लागली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत खर्ची घालण्यात आलेला निधीही पाण्यात गेला आहे. ‘येरे माझ्या मागल्या’ याप्रमाणे पुन्हा रस्त्यांवर खड्डे निर्माण झाले आहेत. एकीकडे विकास होत आहे तर दुसरीकडे विकास झालेल्या रस्त्यांची दुर्दशा होऊ लागली आहे. स्मार्ट सिटी आणि मनपा प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार का? हेच पहावे लागणार आहे. शहरात जलवाहिनी, ड्रेनेजलाईन, गटारी आणि इतर विकासकामांसाठी खोदाई केली जात आहे. त्यामुळे नव्यानेच करण्यात आलेल्या काँक्रिटच्या रस्त्यांचे तीनतेरा वाजू लागले आहेत. त्यामुळे एकीकडे रस्ते करण्यासाठी लाखो रुपये खर्च करणे अन् दुसरीकडे इतर विकासकामांसाठी त्याच रस्त्यांची खोदाई करणे, असा प्रकार पहावयास मिळत आहे. या विकासकामांमुळे रस्त्यांसाठी खर्च केलेल्या लाखो रुपयांचा चुराडा होऊ लागला आहे.
शहरात 24 तास पाणीपुरवठ्यासाठी सर्वत्र जलवाहिन्या घालण्याचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. तब्बल 14 ठिकाणी जलपुंभ उभारले जात आहेत. या माध्यमातून 58 प्रभागांमध्ये 24 तास पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. यासाठी शहरातील विविध भागांमध्ये जलवाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये नव्याने करण्यात आलेल्या काँक्रिटच्या रस्त्यांवर खोदाई केली जात आहे. त्यामुळे विनाकारण काँक्रिटच्या रस्त्यांची व काही ठिकाणी पेव्हर्सचीही दुर्दशा होऊ लागली आहे.
शहरातील आरटीओ सर्कल, रामलिंगखिंड गल्ली, गोगटे सर्कल, केएलई हॉस्पिटल रोड, यंदे खूट, अशोकनगर, धर्मनाथ सर्कल यासह इतर ठिकाणी सुस्थितीत असलेल्या काँक्रिटच्या रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत आरपीडी क्रॉस, जिल्हाधिकारी कार्यालय, क्लब रोड, चन्नम्मा सर्कल, संगोळ्ळी रायण्णा सर्कल, एस. पी. ऑफिस रोड, नेहरुनगर, रामतीर्थनगर, आदी ठिकाणी काँक्रिटचे रस्ते आहेत. मात्र जलवाहिनी आणि इतर विकासाच्या नावाखाली याच काँक्रिटच्या रस्त्यांची तोडफोड होऊ लागली आहे. एलअॅण्डटी कंपनीकडून जानेवारी 2025 पर्यंत 24 तास पाणीपुरवठा करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. सद्यस्थितीत आरसीनगर आणि मुत्यानट्टीत 24 तास पाणी प्रायोगिक तत्त्वावर सोडले जात आहे. त्याचबरोबर इतर ठिकाणीही 24 तास पाणी सोडण्यासाठी जलवाहिन्या घातल्या जात आहेत. मात्र या कामासाठी सुस्थितीत असलेल्या आणि नव्याने करण्यात आलेल्या काँक्रिटच्या रस्त्यांची मात्र वाताहत होताना दिसत आहे.
वाहनधारक-पादचाऱ्यांना अडथळा
शहराच्या विविध ठिकाणी जलवाहिन्या घालण्यासाठी रस्त्यांची खोदाई करण्यात आल्याने वाहनधारक आणि पादचाऱ्यांना मोठा अडथळा निर्माण होऊ लागला आहे. विशेषत: बाजारात अशा खोदाईमुळे वाहतुकीची कोंडीही निर्माण होत आहे. काही ठिकाणी कित्येक दिवसांपासून अर्धवट असलेली खोदाईची कामेही शहरवासियांना डोकेदुखी ठरू लागली आहेत.