Kolhapur : कसबा बावडा-शिये रस्त्यांची दुरावस्था ; प्रवाशांचा जीव मुठीत!
कसबा बावडा–शिये रस्ता खड्ड्यांच्या ताब्यात; नागरिक त्रस्त
कोल्हापूर: शहरानजीकचा कसबा बावडा-शिये रस्ता सध्या अक्षरशः खड्ड्यांच्या साम्राज्याखाली गेला आहे, ज्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना रोज जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर कुठेही पाहिले तरी खड्डेच खड्डे दिसत असल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागते आहे. कोल्हापूर की खड्डेपूर हा आता प्रश्न निर्माण होत आहे.
या मार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना कंबरदुखी आणि अन्य शारीरिक व्याधींचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील सर्वात धोकादायक भाग म्हणजे पंचगंगा नदीवरील पूल. या पुलावरही मोठेचे मोठे खड्डे पडले आहेत. पुलावरील खड्ड्यांमुळे वाहतूक अत्यंत संथ गतीने होते, परिणामी दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
पुलावर खड्ड्यांतून मार्ग काढताना गाडीवरील नियंत्रण सुटून अपघाताची भीती असल्याने प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. विशेषतः पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली समजत नाही, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत आहे . कोल्हापुरात रस्त्यांसाठी ,मिळालेले 100 कोटींचा निधी नेमका गेला कुठे असा सवाल नागरिकांमधून होत आहे प्रशासनाने तातडीने या रस्त्याची आणि पंचगंगा पुलावरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी कनागरिकांकडून जोर धरू लागली आहे.