पनीरमध्ये आढळले बॅक्टेरिया
प्रयोगशाळेचा अहवाल : अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी नमुने केले होते गोळा
बेंगळूर : अन्नातील भेसळ आणि पदार्थांमध्ये रसायनांचा वापर होत असल्यासंबंधी सातत्याने तक्रारी येत असल्याने अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी पनीरसह काही पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले होते. आता प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाला असून पनीरच्या अनेक नमुन्यांमध्ये बॅक्टेरिया आढळून आले आहेत. काही दिवसांपूर्वी बेंगळूरसह राज्यातील अनेक ठिकाणी अन्न सुरक्षा खात्याच्या अधिकाऱ्यांनी पनीरचे नमुने गोळा केले होते. या नमुन्यांची आहार गुणवत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली केली असून त्यात धोकादायक घटक आढळले आहेत. काही नमुन्यांमध्ये बॅक्टेरिया आढळले आहेत.
आईस्क्रिम, शितपेयांचे नमुनेही जमा
आहार सुरक्षा अधिकाऱ्यांनी आईस्क्रिम आणि शितपेयांची विक्री होणाऱ्या स्टॉल, दुकानांवर छापे टाकून तपासणी केली आहे. तेथील नमुनेही गोळा केले असून ते प्रयोगशाळेकडे पाठवून दिले आहेत. अलीकडेच प्लास्टिकचा वापर करून इडली तयार करणे, हिरव्या वाटाण्यांमध्ये कृत्रिम रासायनिक रंगांचा वापर करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. या कारवाईनंतर आता आईस्क्रिम आणि शितपयांचे नमुने तपासण्यात येत आहेत.