बच्चू कडूंचा भाजपला रोकठोक प्रश्न...भाजपाच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी का होत नाही?
भाजपाच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी का केली जात नाही? याचं उत्तर भाजपाने द्यायला हवं असे परखड मत महायुचीचा घटक पक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी एका खाजगी वाहीनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. राज्यात सक्तवसूली संचलनालयाने सरकारच्या विरोधी पक्षाला लक्ष करताना कारवाई केली आहे असा विरोधी पक्षाकडून नेहमीच आरोप केला जातो. पण आता शिंदे- फडणवीस सरकारचे घटकपक्ष असलेल्या प्रहार संघटनेच्या प्रमुखांनीच सरकारला घरचा आहेर दिला आहे.
एका खाजगी वाहिनीला मुलाखत देताना बच्चू कडू यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकिय परिस्थिवर भाष्य केलं. यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले, “समाजाला हुशार करण्याची जबाबदारी राजकीय नेत्यांची असते. पण राजकीय नेते चुकले तर प्रसारमाध्यमांनी त्यांना ताळ्यावर आणलं पाहिजे. जे काही सत्य आहे, तेच तुम्ही मांडलं पाहिजे. यामुळे राजकीय नेते रुसले तर तुमचं काहीच बरं- वाईट होत नाही. तुमच्या मागे ईडीची चौकशीही लागू शकत नाही. ईडी लागणार नाही, अशाप्रकारे काम करत राहा.” अशा भावना व्यक्त केल्या.
जे लोक खरे बोलतात त्यांच्या मागे भाजप ईडी लावत आहे अस तुम्हाला वाटतं का या प्रश्नावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, "मी तर आता भाजपाबरोबर आहे. पण तरीही भाजपावाल्यांना माझा सरळ प्रश्न आहे. ईडीने भाजपाच्या एकाही नेत्याची चौकशी का केली नाही? त्यांनी याचं उत्तर द्यायला हवं. एका सामान्य कार्यकर्त्यालाही हा प्रश्न पडतो. ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) किंवा काँग्रेसच्या नेत्यांची चौकशी केली जाते. पण भाजपाच्या एकाही नेत्याची चौकशी होत नाही. शिंदे गटाच्या नेत्यांमागे ईडीची चौकशी सुरू होती, पण ते आता सत्तेत आले आहेत."असा सवालही त्यांनी केला.