बाळा शिकून मोठी हो-लक्ष्मी हेब्बाळकर
काही झाले तरी शिकणारच : हिरेबागेवाडीतील बालिकेला मदतीचा हात
बेळगाव : मद्यपी वडिलाच्या त्रासामुळे हिरेबागेवाडी येथील एका 12 वर्षीय बालिकेवर शिक्षण अर्ध्यावर सोडण्याची वेळ येऊन ठेपली होती. महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी त्या बालिकेची अवस्था पाहून तिला मदतीचा हात दिला आहे. मद्यपी वडिलांच्या त्रासामुळे त्या बालिकेची आई माहेरी गेली. आता तिलाही शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागणार होते. यासाठी ती बालिका तयार नव्हती. कोणत्याही परिस्थितीत आपण शिकणारच असा तिचा निर्धार होता. स्वत:चे वडीलच तिच्या शिकण्याच्या आशेवर पाणी फेरत होते.
शाळा सोडणार नाही-सहावीतील बालिकेचा निर्धार
त्या बारा वर्षीय बालिकेने शुक्रवारी आपल्या आजीसमवेत महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे घर गाठले. सुरुवातीला युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांनी या बालिकेची व्यथा ऐकून घेतली. तोपर्यंत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर विविध कार्यक्रम आटोपून आपल्या घरी पोहोचल्या. त्यांनीही बालिकेची व्यथा ऐकली. सहावीत शिकणाऱ्या बालिकेने शाळा सोडणार नाही, असे ठामपणे सांगितले. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी महिला व बाल कल्याण खात्याचे उपसंचालक नागराज यांच्याशी संपर्क साधून सौंदत्ती येथील मुलींच्या वसतीगृहात या बालिकेची व्यवस्था करण्याची सूचना केली. तिच्यासाठी कपडे व इतर वस्तू खरेदी करण्यासाठी आर्थिक मदतही केली. लगेच महिला व बाल कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी या बालिकेला सौंदत्तीला पोहोचण्याची व्यवस्था केली. ‘बाळा शिकून मोठी हो,’ असा आशीर्वाद देत लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या बालिकेला सौंदत्तीला पाठविले.