बाबुशची भाजप स्थापना दिन कार्यक्रमाकडे पाठ
मात्र मिरामार येथे स्वतंत्ररित्या स्थापनादिन : प्रदेशाध्यक्ष म्हणाले बाबुश गोव्याबाहेर
पणजी : राजधानी पणजीतील भाजप मुख्यालयात काल रविवारी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला तिसवाडी तालुक्यातील पणजीचे आमदार तथा खुद्द महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांनी ‘दांडी’ मारली. उलट त्यांनी मिरामार येथील आपल्या कार्यालयाजवळ मात्र स्वतंत्रपणे भाजपचा स्थापना दिवस साजरा केल्यामुळे भाजपातील अनेकजण आश्चर्य व्यक्त करीत असल्याचे दिसून आहे.
तिसवाडीतील सर्व भाजप आमदारांनी पणजी कार्यालयात स्थापना दिन कार्यक्रमास हजेरी लावली होती. ताळगांवच्या आमदार आणि बाबुश मोन्सेरात यांच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात यांनी देखील उपस्थिती दाखवली, परंतु बाबुश यांची गैरहजेरी मात्र भाजपचे इतर आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासाठी खटकणारी ठरली. त्यांच्या गैरहजेरीबाबत गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांना प्रसार माध्यमांनी छेडले असता त्यांनी ‘मोन्सेरात गोव्याबाहेर असल्याने ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाही, असे उघडपणे सांगितले.
प्रत्यक्षात मोन्सेरात गोव्यातच आणि पणजीतच उपस्थित होते. तरीही त्यांनी भाजप मुख्यालयातील स्थापना दिन कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आणि मिरामार येथील आपल्या कार्यालयाकडे भाजपचा झेंडा फडकावून स्थापना दिन साजरा केला. पणजी भाजप मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची त्यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यामुळे भाजप व बाबुश मोन्सेरात यांच्यात आलबेल नसल्याची चर्चा खुद्द भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये दिवसभर सुरु होती.