ऑडिओतील ‘मोन्सेरात’ मुळे ‘बाबुश’ संतप्त!
‘घेणारे’ व ‘देणारे’ दोघांनाही आरोपी बनविण्याची मागणी : नोकरी घोटाळा प्रकरणात ध्वनिफितीत नामोल्लेख
पणजी : नोकरीसाठी पैसे प्रकरणात रोज नवनवीन नावांची भर पडत आहे. त्यांना अनुसरून दाखल झालेले गुन्हे आणि कित्येकांच्या अटकेतून अचंबित करणारी माहिती समोर येत आहे. अशाच एका प्रकरणासंबंधी व्हायरल झालेल्या ध्वनिफितीमध्ये ‘मोन्सेरात’ हा नामोल्लेख आल्यामुळे सध्या महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात प्रचंड संतप्त बनले आहेत. त्यातून आता त्यांनी सदर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याही पुढे जाताना त्यांनी ‘घेणारे आणि देणारे’ अशा दोघांनाही आरोपी बनविले पाहिजे अशीही मागणी केली आहे. सरकारी नोकरीच्या आमिषाने शेकडो लोकांना कोट्यावधींचा गंडा घालण्याची अनेक प्रकरणे गेल्या काही दिवसात उजेडात आली आहेत. अजूनही येत आहेत. असे ठकसेन राज्याच्या विविध भागात विखुरलेले असून दाखल झालेल्या तक्रारींच्या आधारे आतापर्यंत दोन डझनपेक्षा जास्त ठकसेन/दलालांना अटकही झालेली आहे. पैकी कित्येकांवर एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेले आहेत. विशेष म्हणजे या साऱ्या ठकबाजीमध्येही महिला आघाडीवर असल्याचे दिसून येते.
स्वनामोल्लेखामुळे महसूलमंत्री व्यथित
सरकारी नोकरीच्या आशेने दिलेले पैसे गमावल्यानंतर ‘हाती धुपाटणे’ आलेल्या लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता, चलबिचलता वाढली आहे. त्यातून आता “आग तेथे धूर” या न्यायाने काही राजकारण्यांची नावेही प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या चर्चेत येऊ लागली आहेत. अशाच एका ध्वनिफितीतून ‘मोन्सेरात’ हा नामोल्लेख आल्यामुळे महसुलमंत्री व्यथित झाले. त्यातूनच त्यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी त्यात लक्ष घालण्याचीही मागणी त्यांनी केली. यापूर्वी कथित गणेश गावकर यांच्या आवाजातील ध्वनिफित समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. तिच्या आधारे माहिती हक्क कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी कुळे पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे संपप्त बनलेले गणेश गावकर यांनी सदर ध्वनिफित ताम्हणकर यांच्याकडे कशी पोहोचली याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. याच ध्वनिफितीत ‘मोन्सेरात’ हा नामोल्लेख झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे : बाबूश
याप्रश्नी प्रतिक्रिया देताना महसुलमंत्र्यांनी सदर प्रकार अत्यंत गंभीर स्वऊपाचा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्याची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याही पुढे जाताना त्यांनी ‘घेणाऱ्या’ बरोबरच ‘देणाऱ्यांनाही’ आरोपी बनविले पाहिजे अशी मागणीही केली आहे. अन्यथा अशा आरोपांमुळे राजकर्ते, सरकार आणि पक्षाचीही प्रतिमा मलीन होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. याच प्रश्नी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यापूर्वी केलेल्या एका वक्तव्याचाही बाबूश मोन्सेरात यांनी समाचार घेतला आहे. ‘नोकरीचे आमिष दाखवून गंडा घातलेल्यांकडून सर्व मालमत्ता वसूल करून त्याद्वारे संबंधितांचे पैसे परत देण्यात येतील’, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. त्याचा समाचार घेताना मोन्सेरात यांनी, अशाप्रकारे मालमत्ता जप्त करण्यास सरकार म्हणजे ‘वसुली एजंट’ नाही, अशा शब्दात खडे बोल सुनावले आहेत.
पर्रीकरांच्या काळात कुणाची बिशाद नव्हती : उत्पल
या वादात उत्पल पर्रीकर यांनीही उडी घेतली असून आपले वडील स्व. मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात अशाप्रकारे नोकऱ्यांची विक्री करण्याची कुणाची बिशाद झाली नसती, असे वक्तव्य करून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर ‘नथीतून तीर’ मारला आहे. आपल्या वडिलांबद्दलचा यांचा आदर्श केवळ ‘दिखाऊ व नामधारी’ आहे, यांचे खरे आदर्श बाबुश मोन्सेरात आहेत, असे टीकास्त्रही उत्पल यांनी सोडले आहे. नोकरी घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच हीच मागणी यापूर्वी बाबुश मोन्सेरात यांनीही केली असून मुख्यमंत्र्यांनी स्वमंत्रीमंडळातील सहकाऱ्याची मागणी गांभीर्याने व त्वरित पूर्ण करावी, असे आवाहनही केले आहे.