‘लॉगआउट’मध्ये बाबिल खान
ओटीटीवर प्रदर्शित होणार चित्रपट
कला आणि द रेल्वेमॅन यासारख्या चित्रपटांमध्ये स्वत:च्या अभिनयाची जादू दाखविणारा बाबिल खान आता ‘लॉगआउट’ या चित्रपटात दिसून येणार आहे. याचा ट्रेलर सादर करण्यात आला असून तो अत्यंत रोमांचक आहे. हा एक थ्रिलर मिस्ट्री धाटणीचा चित्रपट असून यात अॅक्शन, टेन्शन, ड्रामा आणि सस्पेंससमवेत अनेक ट्विस्ट दिसून येणार आहेत.
लॉगआउट या चित्रपटात दिवंगत अभिनेता इरफानचा पुत्र बाबिल खानसोबत रसिका दुग्गल, निमिशा नायर आणि गंधर्व दीवान हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
लॉगआउटची कहाणी 26 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर प्रत्युषची आहे. ही व्यक्तिरेखा बाबिलने साकारली आहे. त्याचे 10 दशलक्ष फॉलोअर्स होण्यापूर्वीच त्याच्या आयुष्याला एक नकोसे वळण मिळते. एका चाहत्याचा हट्ट त्याला एका धोकादायक खेळात लोटतो, यामुळे त्याचे पूर्ण जीवन उद्ध्वस्त होते. एकेदिवशी त्याचा मोबाइल हरवतो आणि मग त्याच्या आयुष्याला मोठमोठे धक्के बसू लागतात असे यात दाखविण्यात आले आहे.
डिजिटल माध्यमावर निर्भरतेमुळे निर्माण झालेल्या समस्येला स्पर्श करणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला नेटिजन्सची पसंती मिळाली आहे. बाबिलचा हा चित्रपट 18 एप्रिल रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म झी 5 वर प्रदर्शित होणार आहे.