विकसित भारताच्या निर्मितीला बाबासाहेबांची तत्वे बळ देतील!
पंतप्रधान मोदी यांचा आशावाद : जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. त्यांच्या प्रेरणेतूनच आज देश सामाजिक न्यायाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. आपल्या ‘एक्स’ हँडलवर पंतप्रधान मोदी यांनी “सर्व देशवासीयांच्या वतीने भारतरत्न आदरणीय बाबासाहेबांना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम” असे ट्विट केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तत्वे आणि आदर्श स्वावलंबी आणि विकसित भारताच्या निर्मितीला बळ आणि गती देतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सोमवारी देशभर साजरी करण्यात आली. त्यांना अभिवादन करण्यासाठी राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच बऱ्याच शहरांमध्ये चित्ररथ मिरवणुकांचे आयोजनही करण्यात आले होते.
पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकरांप्रति अभिवादनपर भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या. डॉ. आंबेडकरांनी आपल्या देशवासियांना न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या लोकशाही मूल्यांवर आधारित भारतीय संविधान दिले. भारतीय संविधान हे सामाजिक न्याय आणि समावेशक विकासाचे सर्वात शक्तिशाली साधन आहे, असे खर्गे यांनी म्हटले आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी ट्विट करून डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले.