बाबासाहेबांचे संपूर्ण आयुष्य दलित, गरिबांच्या उन्नतीसाठी खर्च
उचगाव आंबेडकर नगरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नूतन मूर्तीची प्रतिष्ठापना-उद्घाटन : मान्यवरांची समारंभास उपस्थिती
वार्ताहर/उचगाव
बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील मागासवर्गीय, दलित, गरीब यांच्या उन्नतीसाठी खर्च केले. ते एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते. त्यांनी केवळ सामाजिक न्याय आणि सामाजिक विषमतेविरुद्ध लढा दिला नाही तर महिला सक्षमीकरणासाठीही बाबासाहेबांनी खूप काम केले आहे. बाबासाहेबांनी महिलांचे समान हक्क, लोकसंख्या नियंत्रण, समान नागरी संहिता आणि मूलभूत जबाबदाऱ्या याविषयी लोकांना जागरुक केले. बाबासाहेब म्हणायचे की, मी स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मोजत असतो. त्यांच्या या पुरोगामी विचारांमुळे ते आज कोट्यावधी भारतीयांसाठी प्रेरणास्रोत बनले आहेत. बाबासाहेबांनी सामान्यातल्या सामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क प्राप्त करून दिला, असे विचार डॉ. बी. आर. आंबेडकर विचारवंत व युवा वक्ते भीमपुत्र बी. संतोष यांनी व्यक्त केले. उचगाव येथील आंबेडकर नगरमध्ये उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नूतन मूर्तीची प्रतिष्ठापना आणि उद्घाटन समारंभात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
उचगाव येथे समुदाय भवनच्या प्रांगणात भव्य असा चौथरा आणि त्यावरती सात फूट उंचीची भव्य बाबासाहेबांची मूर्ती आंबेडकर नगरवासियांच्या स्वबळावर साकारण्यात आली आहे. या नूतन मूर्तीचा उद्घाटन सोहळा शनिवारी रात्री पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उचगाव ग्रा. पं. अध्यक्षा मथुरा तेरसे होत्या. प्रारंभी तथागत गौतम बुद्ध मूर्तीचे उद्घाटन आणि पूजन उचगाव ग्रा.पं. उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे आणि अ.भा. दलित संघटनेचे अध्यक्ष मल्लेश चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. तर देणगी फलकाचे उद्घाटन कर्नाटक राज्य दलित संघटनाचे संचालक सिद्धाप्पा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत समुदाय भवन कमिटीचे अध्यक्ष यादो कांबळे यांनी केले. प्रास्ताविक अप्पाजी कांबळे यांनी केले. उपस्थितांचा सत्कार उद्घाटक व मिरवणूक अध्यक्ष गजानन कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय बुद्ध महासभा बेळगाव यांनी बुद्धवंदना सादर केली. या नूतन मूर्ती प्रतिष्ठापना आणि उद्घाटन सोहळ्यानिमित्त खास विद्युत रोषणाई करण्यात आली होती. याचेही उद्घाटन यावेळी डॉ. साहुकार कांबळे, मल्लेश कुरंगी यांच्या हस्ते करण्यात आले.
मान्यवरांचा सत्कार
नूतन बाबासाहेबांच्या मूर्तीचे उद्घाटन सर्व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. तर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सान्वी गजानन कोरे या विद्यार्थिनीने भरतनाट्याम सादर करून प्रेक्षकांकडून वाहव्वा मिळवली. आंबेडकरनगरमधील जीएसएस कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत असणारी भाग्यश्री अपय्या कांबळे आणि पीएसआय म्हणून निवड झालेली सध्या बेंगळूर येथे ट्रेनिंग घेत असलेली लक्ष्मी भरमा देवरमनी या दोन मुलींचा यावेळी खास सत्कार अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला.
देणगीतून साकारली मूर्ती
बाबासाहेबांच्या या नूतन मूर्तीसाठी आंबेडकरनगरमधील 80 नागरिकांनी मोठ्या देणग्या देऊन स्वबळावरती ही मूर्ती उभी केल्याने या सर्व देणगीदारांचा तसेच चौथरा आणि मूर्तीसाठी काम केलेल्या सर्व गवंडी, मेस्त्राr, इंजिनिअर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उचगाव पंचक्रोशीतील आजी-माजी सैनिक संघटनेचे सर्व फौजी युनिफॉर्ममध्ये उपस्थित राहून बाबासाहेबांच्या नूतन मूर्तीला मानवंदना दिली. सूत्रसंचालन एन. ओ. चौगुले व भाग्यश्री कांबळे यांनी केले. तर आप्पया कांबळे यांनी आभार मानले. या उद्घाटन समारंभाला बेळगाव जिल्हा अध्यक्ष दलित संघटना व दलित संघटनेचे अनेक कार्यकर्ते गावागावांतून उपस्थित होते. तसेच आंबेडकर नगर आणि उचगाव ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.