बाबर आझमला संघातून डच्चू
वृत्तसंस्था/ लाहोर
इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी पाकचा माजी कर्णधार बाबर आझमला पीसीबीने डच्चू दिला आहे. त्याचप्रमाणे पाकचे वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदी आणि नसिम शहा यांनी शेवटच्या दोन कसोटीसाठी संघातून माघार घेतली आहे.
बाबर आझमने यापूर्वी 54 कसोटी सामन्यात पाकचे प्रतिनिधीत्व केले असून त्याला पहिल्यांदाच पाकच्या कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. सध्या पाक आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात असून यातील मुल्तानची पहिली कसोटी इंग्लंडने जिंकून आघाडी घेतली आहे. या पहिल्या कसोटीत दोन्ही संघांकडून धावांचा पाऊस पाडला गेला. बाबर आझम, नसिम शहा, सर्फराज अहमद आणि शाहिन आफ्रिदी यांना विश्रांती देण्याचा निर्णय पाकच्या निवड समितीने घेतला आहे. पाक संघातील अब्रार अहमद याला डेंग्यूची लागण झाली असून त्याची प्रकृती सुधारत आहे. पण तो निवडीसाठी उपलब्ध होऊ शकला नाही.
दुसऱ्या कसोटीसाठी निवडण्यात आलेल्या पाक संघामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद अली आणि फिरकी गोलंदाज साजिद खान हे दोन नवे चेहरे आहेत. या दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी पीसीबीने 16 जणांचा संघ जाहीर केला आहे.
पाक कसोटी संघ
शान मसूर (कर्णधार), सौद शकिल (उपकर्णधार), अमीर जमाल, अब्दुल्ला शफिक, हसिबुल्ला (यष्टीरक्षक), कमरान गुलाम, मेहरान मुमताझ, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरेरा, मोहम्मद रिझवान, नौमन अली, सईम अयुब, साजिद खान, सलमान अली आगा, आणि झाहिद मेहमूद.