बाबा राम रहीमला 40 दिवसांचा पॅरोल
शिक्षा झाल्यापासून तब्बल 406 दिवस पॅरोलवर मुक्त
वृत्तसंस्था/ चंदीगड
डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम सिंग याला 40 दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. त्याला शिक्षा झाल्यापासून राम रहीमने एकूण 366 दिवस तुरुंगाबाहेर घालवले आहेत. आता मंजूर झालेल्या पॅरोलमुळे ही संख्या 406 दिवसांवर पोहोचली आहे. यापूर्वी पंचकुला येथील सीबीआय न्यायालयाने ऑगस्टमध्ये त्याला पॅरोल मंजूर केला होता. राम रहीमला 2017 मध्ये डेरा सच्चा सौदाच्या दोन महिलांच्या लैंगिक शोषणासाठी दोषी ठरवण्यात आले होते. 2017 मध्ये त्यांना 10 वर्षांची शिक्षा आणि मोठा आर्थिक दंड ठोठावला होता. सीबीआयने सहा वर्षांनंतर या प्रकरणात पीडितांचे जबाब नोंदवले. हे लैंगिक शोषण 1999 मध्ये झाले होते, परंतु पीडितांचे जबाब 2005 मध्ये नोंदवण्यात आल्यानंतर न्यायालयाने राम रहीमला दोषी ठरवले होते.
2025 मध्ये राम रहीम 91 दिवसांसाठी तुरुंगाबाहेर होता. आतापर्यंत दिलेले पॅरोल सहसा एक-दोन दिवस किंवा एक-दोन आठवड्यांसाठी नसून एका महिन्यासाठीही दिलेले आहेत. 2025 मध्ये देखील, राम रहीमला वर्षाच्या सुरुवातीला, 28 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत पूर्ण महिना पॅरोल मिळाला. त्यानंतर, तो तुरुंगात परतल्यानंतर केवळ 40 दिवसांत पुन्हा दुसऱ्यांदा पॅरोल मिळाला होता.