For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बी हेवी मोलॅसिस, इथेनॉल, साखर दर वाढीची अपेक्षा

01:50 PM Jan 31, 2025 IST | Radhika Patil
बी हेवी मोलॅसिस  इथेनॉल  साखर दर वाढीची अपेक्षा
Advertisement

कोल्हापूर / धीरज बरगे : 

Advertisement

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उसाचा रस, बी हेवी मोलॅसिस इथेनॉल आणि साखरेच्या किमान हमीभावात वाढ होण्याची अपेक्षा साखर कारखानदारांना होती. मात्र बैठीकमध्ये वाढ करण्याबाबत निर्णय न झाल्याने कारखानदारांचा अपेक्षा भंग झाला. सी मोलॅसिस इथेनॉलच्या दरात वाढ केली असली तरी सी मोलॅसिसपासून अत्यल्प प्रमाणात इथेनॉल निर्मिती होते. त्यामुळे सी मोलॅसिस इथेनॉल दरवाढीच्या निर्णयानंतरही साखर उद्योगात निराशाजनक वातावरण आहे. त्यामुळे आता केंद्रीय अर्थसंकल्पाकडे साखर उद्योगाच्या नजरा असून उसाचा रस, बी-हेवी मोलॅसिस इथेनॉल आणि साखरेच्या किमान हमीभावात दरवाढ करुन साखर उद्योगाला दिलासा द्यावा, अशी अपेक्षा साखर कारखानदारांची आहे.

केंद्रीय मंत्री मंडळाने बुधवारी 2024-25 इथेनॉल पुरवठा वर्षासाठी सी-हेवी मोलॅसिसपासून बनवलेल्या इथेनॉलच्या खरेदी किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. ही दरवाढ करताना उसाचा रस आणि बी-हेवी मोलॅसिसच्या इथेनॉल दरात कोणतीही वाढ केली नाही. रस आणि बी-हेवी मोलॅसिसपासुन बनवलेल्या इथेनॉलच्या दरात 2022-23 मध्ये वाढ केली होती. यानंतर उसाच्या एफआरपीमध्ये सुमारे 11.5 टक्के इतकी वाढ झाली. इथेनॉल दरवाढीच्या तुलनेत उसाच्या एफआरपीमध्ये जास्त वाढ झाल्याने इथेनॉल उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना वेळेत एफआरपी देण्यासाठी उसाचा रस आणि बी-हेवी मोलॅसिसपासून निर्मिती होणाऱ्या इथेनॉलच्या किंमतीतही वाढ झाली तर ती साखर कारखानदारांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

Advertisement

  • पाच ते सात टक्केच इथेनॉल निर्मिती

जिल्ह्यातील मोजक्याच साखर कारखान्यांकडून सी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती केली जाते. देशातील चित्र पाहिले तर चालू इथेनॉल वर्षात 650 कोटी लिटर इथेनॉल उत्पादन होण्याची शक्dयाता आहे. त्यात उसाचा रस आणि वी हेवी मोलॅसिसपासून उत्पादित होणाऱ्या इथेनॉलचा वाटा 90 टक्क्यांपर्यंत असणार आहे. तर सी हेवी मोलॅसिसपासून जेमतेम पाच ते सात टक्केच इथेनॉल निर्मिती केली जाणार आहे. त्यानूसार सी हेवी मोलॅसिसपासून केवळ 50 कोटी लिटर इथेनॉल निर्मितीची शक्यता आहे. त्यामुळे सी हेवी मोलॅसिसपासून निर्मिती होणाऱ्या इथेनॉलपासून साखर कारखाने व शेतकरी यांना काहीही फायदा होणार नाही, असे मत साखर उद्योगातील तज्ञांमधून व्यक्त होत आहे.

  • एफआरपी देण्यात अडचणी

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत उसाचा रस आणि बी-हेवी मोलॅसिसपासून निर्मिती होणाऱ्या इथेनॉलच्या दरात वाढ होण्याबाबत निर्णय होईल, अशी अपेक्षा साखर उद्योगाला होती. तसेच साखरेच्या किमान हमीभाव वाढीकडे लक्ष होते. ऊसाचा रस, बी-हेवी मोलॅसिस इथेनॉलसह साखरेच्या किमान हमीभावात कोणतीही वाढ न झाल्याने साखर कारखान्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ होणार आहे. अगोदरच कारखान्यांकडून एफआरपी थकीत पडली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे कारखानदारीचे लक्ष होते. मात्र अपेक्षित निर्णय न झाल्याने कारखान्यांना आता एफआरपी देण्याचेही आव्हान असणार आहे.

  • जिल्ह्यातील साखर कारखानदारी अडचणीत

केंद्र सरकाराने सी हेवी मोलॅसिसपासून निर्मिती केल्या जाणाऱ्या इथेनॉलच्या दरात तीन टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र जिल्ह्यातील 29 सहकारी व खासगी साखर कारखान्यांपैकी केवळ पाच ते सातच कारखाने सी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करतात. बहुतांश कारखान्यांकडुन स्पिरीट व अल्कोल निर्मिती केली जात आहे. बी मोलॅसिसपासून मोठयाप्रमाणात इथेनॉल निर्मिती केली जाते पण या इथेनॉलच्या दरात वाढ केलेली नाही. तसेच साखरेच्या किमान हमीभावामध्येही वाढ केलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील साखर उद्योगासाठी सी मोलॅसिस दरवाढीतून कोणताही दिलासा मिळाला नसून उलट साखर कारखान्यांच्या आर्थिक संकटात वाढच होणार आहे.

  • अर्थसंकल्पामध्ये साखर उद्योगाला भरारी द्यावी

इथेनॉलसह साखरेचा किमान हमीभाव वाढीबाबत निर्णय अपेक्षित होता. पण त्यावर विचार झालेला नाही. उत्पादन खर्च 4166 रुपये प्रतिक्विंटल व बाजारात मिळणारे दर यामध्ये फारच तफावत आहे. यामुळे साखर कारखाने तोट्यात सुरु आहेत. थकीत ऊस बिलाची रक्कम वाढत असल्याने ऊस उत्पादक शेतकरीही अर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये साखर उद्योगाच्या अपेक्षा पूर्ण करुन साखर उद्योगाला भरारी देण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

                                                                                                    - पी. जी. मेढे, साखर उद्योग अभ्यासक.


Advertisement
Tags :

.