महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बी.कॉम पाचव्या सत्राचा पेपर फुटला

11:09 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आरसीयूचा कारभार चव्हाट्यावर : अर्ध्यातासात उत्तरपत्रिका घेतली मागे

Advertisement

बेळगाव : आपल्या गलथान कारभाराने नेहमीच चर्चेत असणारे राणी चन्नम्मा विद्यापीठ पुन्हा एकदा कात्रीत सापडले आहे. बी.कॉमच्या पाचव्या सत्राच्या पहिल्याच पेपरची प्रश्नपत्रिका फुटल्याने शुक्रवारी खळबळ उडाली. उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी देऊन अर्धा तास झाला, तोच विद्यापीठाकडून संदेश आल्याने उत्तरपत्रिका पुन्हा मागे घेण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली. त्यामुळे यावेळी तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी विद्यार्थी व शिक्षकांमधून केली जात आहे. आरसीयूकडून बी.कॉम पाचव्या सत्राच्या परीक्षांना शुक्रवारपासून प्रारंभ झाला. सकाळी 9.30 वाजता विद्यार्थ्यांना फायनान्शियल मॅनेजमेंट विषयाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत उत्तरे लिहिण्यास सुरूदेखील केले. परंतु, दहाच्या सुमारास विद्यापीठाकडून सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना ई-मेल करून उत्तरपत्रिका मागे घेण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे अर्ध्या तासातच उत्तरपत्रिका मागे घ्यावी लागली. प्रश्नपत्रिका फुटल्याने शुक्रवारचा पेपर रद्द करण्यात आल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.

Advertisement

...पण विद्यार्थ्यांचे काय?

पेपरफुटीची घटना घडल्यानंतर विद्यापीठाने शुक्रवारचा पेपर रद्द करून तो पुढे घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे. पेपर पुन्हा घेतला जाईल, परंतु वर्षभर अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांचे परिश्रम वाया जात आहेत, याकडे कोणाचेच लक्ष नाही. पदवीचा पहिलाच पेपर फुटल्याने विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत. नवे कुलगुरु, तसेच इतर अधिकारी विद्यापीठाला मिळाल्यानंतर कारभार सुधारेल, असे वाटत होते. परंतु, नवीन अधिकाऱ्यांनीही विद्यार्थ्यांची निराशाच केली आहे.

पेपरफुटी नेहमीचीच!

बेळगावचे राणी चन्नम्मा विद्यापीठ व वाद हे समीकरण काही नवे नाही. यापूर्वीही विद्यापीठाच्या तुघलकी कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. काटेकोर पद्धतीने नियोजन नसल्याने अनेकवेळा पेपरफुटीच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्याव्या लागल्या आहेत. परंतु, आजतागायत पेपरफुटीची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटीचे नेमके गौडबंगाल काय? असाही प्रश्न समोर येत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article