बी.ए. फिल्म मेकिंग १३२ क्रेडिटचा अभ्यासक्रम
कोल्हापूर/ अहिल्या परकाळे :
शिवाजी विद्यापीठाने गतवर्षीपासून बी. ए. फिल्म मेकिंग व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केला आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार या अभ्यासक्रमाला तीन वर्षात सहा सेमिस्टर होणार आहेत. प्रत्येक सेमिस्टरला २२ क्रेडिट मिळणार आहेत. प्रत्येक पेपरला ६० गुणांचा लेखी पेपर आणि ४० गुणांचे प्रात्यक्षिक आहे. प्रत्येक प्रवर्गासाठी शासनाची शिष्यवृत्ती मंजूर झाल्याने विद्यार्थ्यांना अत्यल्प प्रवेश शुल्क भरावे लागत आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी शिवाजी विद्यापीठाने केली आहे. याचाच एक भाग म्हणून बारावीनंतर विद्यापीठ परिसरातील मास कम्युनिकेशन विभागात बी. ए. फिल्म मेकिंग अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाला ४० ची क्षमता आहे. गतवर्षी २९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर यंदाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 'मेटाफर' या लघुपटाला नॅशनल अॅवॉर्ड मिळाले आहे. विद्यार्थ्यांना शुटींगसाठी कॅमेरा, ट्रॉली, एडिटींगसाठी दहा संगणक आणि आवश्यक त्या सुविधा पुरवल्या आहेत. तसेच शुटींगसाठी थिएटर उभारण्यात आले आहे. अभिनय, लघुपट चित्रीकरण, लघुपट लेखन, कॅमेरा हँडलिंग, चित्रीकरण एडिटींग, दिग्दर्शन आदी गोष्टी शिकवल्या जातात. प्रत्यक्ष काम करणारे कलाकार, कॅमेरामन, दिग्दर्शक, निर्मात बोलावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे आधुनिक पध्दतीने लघुपट तयार करण्याचे तंत्रज्ञान शिकवले जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानानुसार फिल्म मेकिंग अभ्यासक्रमात शिकवले जात आहे. करमणुकीच्या क्षेत्रात होणाऱ्या बदलानुसार आपण काय केले पाहिजे याचा अभ्यासक्रम अनुभवी तज्ज्ञांकडून शिकवला जात आहे. चित्रपटसृष्टीत प्रत्यक्ष काम करणाऱ्या तज्ज्ञांची अध्यापनासाठी नियुक्ती केली आहे. या अभ्यासक्रमात शिक्षण घेतानाच नोकरीची संधी मिळणार, यात शंका नाही.
- अप्रेंटिसशिपची संधी
अभ्यासक्रमाशी संबंधित कंपनीमध्ये सहा महिने (अप्रेंटिसशिप) प्रत्यक्ष काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. या कालावधीतील कामानुसार कंपनी मॅनेजरने ३० टक्के गुण द्यायचे आहेत. विद्यार्थी कंपनीत काम करतो की नाही यासंदर्भात कंपनीला भेट देऊन रिपोर्टनुसार शिक्षकाने ३० टक्के गुण विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत. याचा शोधप्रबंधही विभागाला विद्यार्थ्यांनी सादर करावयाचा आहे. तसेच या कालावधीत विद्यार्थ्यांना सरकार ५० टक्के व कंपनी ५० टक्के मानधन देते.
- नवनिर्मितीक्षम मनुष्यबळ निर्मिती
भारत व जगभरातला मनोरंजन उद्योग वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रात विशेष मनुष्यबळाची निकड निर्माण झाली आहे. ओटीटी व डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे तंत्रावर आधारीत नवनिर्मितीक्षम मनुष्यबळ तयार करणे या कोर्सचे उद्दीष्ट आहे.
-डॉ. शिवाजी जाधव (समन्वयक, बी. ए. फिल्म मेकिंग)
- शासनाची शिष्यवृत्ती
बी. ए. फिल्म मेकिंग अभ्यासक्रमाला पहिल्या वर्षापासूनच शासनाच्या सर्व प्रकारची शिष्यवृत्ती मिळत आहे. खुल्या गटातील विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती आणि पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या सुविधा मिळतात. तसेच ओबीसी, एस. टी. आणि एस. सी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती मिळत आहे. सर्व प्रकारची शिष्यवृत्ती मिळत असल्याने विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्क भरावे लागत आहे.
- प्रत्येक वर्षाचे प्रवेश शुल्क
प्रवर्ग शुल्क
खुला प्रवर्ग ३२ हजार
ओबीसी २२ हजार
एस. टी., एस. सी. २ हजार ५००