आजरा कारखाना राजकारणाला कलाटणी; निवडणुकीतून बाहेर पडण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय
आजरा प्रतिनिधी
आजरा साखर कारखाना निवडणूक बिनविरोध करण्याबाबत मंगळवारी जिल्ह्यातील नेत्यांशी स्थानिक नेते मंडळींनी चर्चा केली. तर मंगळवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रसच्या स्थानिक नेत्यांनी निवडणुकीतून बाहेर होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविषयी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना माहिती दिली. तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले त्या सर्वांचे अर्ज शुक्रवार दि. 1 डिसेंबर रोजी माघार घेण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांनी दिली. राष्ट्रवादीच्या या निर्णयाने मात्र कारखान्याच्या राजकारणाला कलाटणी मिळणार आहे.
आजरा कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यानंतर मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले. कारखाना बिनविरोध व्हावा अशी बहुतांशी मंडळींची इच्छा आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे नेत्यांची बैठक होऊन चर्चा झाली. या चर्चेत दोन्ही बाजूच्या स्थानिक नेत्यांनी आपापली भूमिका मांडली. त्यानंतर नेते ठरवतील तो फॉर्म्युला मान्य करून निवडणूक बिनविरोध करणे, जागा वाटपाचा फॉर्म्युला मान्य नसेल तर स्वतंत्र पॅनेल करून निवडणुकीला सामोरे जाणे किंवा निवडणुकीतून बाहेर होणे हे तीन पर्याय नेत्यांनी सर्वांसमोर ठेवले. यानंतर राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल केलेल्या सर्व उमेदवारांशी चर्चा केली आणि निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
यावेळी दोन्ही राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले सर्वच उमेदवार उपस्थित होते. ज्येष्ठ संचालक विष्णूपंत केसरकर हे तब्येतीच्या कारणास्तव तर वसंतराव धुरे बाहेरगावी असल्याने यावेळी अनुपस्थित होते. मात्र या दोघांशीही फोनवरून चर्चा केली असून या निर्णयास त्यांचीही सहमती असल्याचे मुकुंदराव देसाई, सुधीर देसाई यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या निर्णयानंतरही मंगळवारी दुपारी नेत्यांची पुन्हा बैठक होऊन जागांबाबत नेत्यांकडून विचारणा झाली मात्र स्थानिक राष्ट्रवादी आपल्या निर्णयावर ठाम असून शुक्रवारी माघार घेतली जाणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.