अझीम प्रेमजींकडून मुलांना 1 कोटींची भेट
दोन मुलांना मिळणार समभागांच्या स्वरुपात भेट
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी त्यांच्या ऋषद प्रेमजी आणि तारिक प्रेमजी या दोन सुपुत्रांना तब्बल 1.02 कोटी रुपये मूल्यांचे इक्विटी शेअर्स भेट दिले आहेत. या संदर्भात कंपनीने शेअर बाजाराला ही माहिती दिली. 78 वर्षीय टेक संस्थापक प्रेमजी यांच्याकडे गेल्या आठवड्यापर्यंत कंपनीचे 22.58 कोटीपेक्षा जास्त समभाग होते. विप्रोच्या समभागांची किंमत सध्या 472.9 रुपये प्रति समभाग आहे. अशा परिस्थितीत हस्तांतरित समभागांचे मूल्य 483 कोटी रुपये होते. टेक दिग्गज अझीम प्रेमजी यांचा मुलगा ऋषद प्रेमजी सध्या विप्रोचे कार्यकारी अध्यक्ष आणि आयटी उद्योगातील एक प्रमुख चेहरा आहेत.
कंपनीने काय निवेदन दिले
विप्रोने बुधवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, ‘मी, अझीम एच. प्रेमजी, तुम्हाला सांगू इच्छितो की विप्रो लिमिटेडमधील माझे 1,02,30,180 समभाग, जे कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या 0.20 टक्के आहेत ते ऋषद यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. समभाग भेट म्हणून दोन्ही मुलांना देण्यात आले आहेत. तथापि, या व्यवहारामुळे कंपनीतील एकूण प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाच्या शेअरहोल्डिंगमध्ये कोणताही बदल होणार नाही आणि प्रस्तावित व्यवहारानंतरही तो तसाच राहील. विप्रोने शेअर बाजाराला दिलेल्या वेगळ्या माहितीत ऋषद प्रेमजी म्हणाले की, विप्रो लिमिटेडचे 51,15,090 इक्विटी शेअर्स अझीम प्रेमजींकडून भेट म्हणून मिळाले आहेत. तारिक यांना भेट म्हणून 51,15,090 शेअर्स मिळाले आहेत.