अझरबैजानकडून आर्मेनियावर हल्ला
काराबाखच्या अनेक भागांवर कब्जा : बॉम्बवर्षावात 3 सैनिकांचा मृत्यू
वृत्तसंस्था / येरेवान, बाकू
तैवान आणि युक्रेन संकटात जग अडकून असल्याचे पाहून मध्य आशियातील देश अझरबैजानने पुन्हा एकदा आगळीक केली आहे. अझरबैजानने तुर्कियेकडून मिळालेल्या घातक बायरकतार ड्रोनच्या मदतीने आर्मेनियाच्या अनेक शस्त्रास्त्रांना नष्ट केले तसेच नागोर्नो-काराबाखच्या अनेक भागांवर कब्जा केला आहे. अझरबैजानने नागोर्नो-काराबाखच्या वादग्रस्त भागात कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप दोन्ही देशांदरम्यान शस्त्रसंधी घडवून आणणाऱया रशियाने केला आहे.
आर्मेनियाच्या अवैध शस्त्रसज्ज गटांनी हल्ले करत आमच्या 3 सैनिकांना ठार केल्याचा आरोप यापूर्वी अझरबैजानने केला होता. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत हा घातक हल्ला केल्याचा दावा अझरबैजानकडून करण्यात आला आहे. यापूर्वी 2020 मध्ये आर्मेनियात सुमारे 6 आठवडय़ांपर्यंत भीषण संघर्ष झाला होता, ज्यात 6,500 हून अधिक लोक मारले गेले हेते. त्यानंतर रशियाने हस्तक्केप करत दोन्ही देशांदरम्यान शस्त्रसंधी घडवून आणली होती. या पूर्ण वादग्रस्त भागात रशियाचे अनेक शांतिसैनिक तैनात आहेत. अझरबैझानच्या सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने एका वक्तव्याद्वारे म्हटले आहे.
आर्मेनिया आणि अझरबैजानच्या प्रतिनिधींसोबत मिळून स्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत असे रशियाने म्हटले आहे. काराबाखच्या सैन्याने आमच्या एका सैनिकाला लाचिन जिल्हय़ात ठार केल्याचे अझरबैजानच्या संरक्षण मंत्रालयाने यापूर्वी म्हटले होते. या भागातील सामरिकदृष्ठय़ा महत्त्वपूर्ण उंचीवरील क्षेत्रांवर आम्ही कब्जा केला आहे. आर्मेनियाच्या अवैध शस्त्रसज्ज गटांच्या दहशतवादी कारवायांनंतर हे पाऊल उचलल्याचे अझरबैजानच्या सैन्याने म्हटले आहे.
तुर्किये अन् पाकची मदत
अझरबैजान शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असून आमच्या दोन सैनिकांची हत्या केली तसेच 14 जणांना जखमी केल्याचे आर्मेनियाच्या सैन्याने नमूद केले आहे. अझरबैजान आणि आर्मेनिया दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून शत्रुत्व राहिले आहे. या दोन्ही देशांमध्ये 2020 आणि 1990 च्या दशकात नागोर्नो-काराबाखवरून युद्ध झाले आहे. काराबाखमध्ये आर्मेनियन वंशाच्या लोकांचे वास्तव्य आहे, परंतु कायदेशीरदृष्टय़ा या भूमीवर अझरबैजानचे नियंत्रण आहे. अझरबैजानला तुर्किये आणि पाकिस्तानच्या सैन्याकडून मोठी मदत मिळत आहे. तुर्कियेकडून मिळालेल्या ड्रोनचा वापर अझरबैजान करत आहे.
संघर्षाची पार्श्वभूमी
नागोर्नो-काराबाख भाग 20 वर्षांपेक्षा अधिक काळापासून दोन्ही देशांमधील वादाचे कारण ठरला आहे. 1988 पासून दोन्ही युरेशियन देश नागोर्नो-काराबाख भागावर कब्जा करू पाहत आहेत. हे क्षेत्र आंतरराष्ट्रीय स्वरुपात अझरबैजानचा हिस्सा आहे, परंतु त्यावर 1994 पासून आर्मेनियन वंशाच्या लोकांचा कब्जा आहे. हा भाग इराण, रशिया आणि तुर्कियेच्या सीमेवर एक महत्त्वपूर्ण सामरिक ठिकाणी आहे.