For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

अझारेन्का, रायबाकिना उपांत्य फेरीत दाखल

06:45 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
अझारेन्का  रायबाकिना उपांत्य फेरीत दाखल

मियामी ओपन टेनिस : मेदवेदेव्ह, अल्कारेझ, सिनर, डिमिट्रोव्ह उपांत्यपूर्व फेरीत

Advertisement

वृत्तसंस्था/ मियामी गार्डन्स, अमेरिका

विद्यमान चॅम्पियन रशियाचा डॅनिल मेदवेदेव्हने कारकिर्दीतील 350 वा विजय मिळवित येथे सुरू असलेल्या मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. अग्रमानांकित कार्लोस अल्कारेझनेही शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविताना मुसेटीचा पराभव केला. महिलांमध्ये व्हिक्टोरिया अझारेन्का व इलेना रायबाकिना यांनी शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले आहे.

Advertisement

मेदवेदेव्हने डॉमिनिक कोफरचा 7-6 (7-5), 6-0 असा पराभव करून सलग चौथ्या वर्षी या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. स्पेनच्या अल्कारेझने 23 व्या मानांकित लॉरेन्झो मुसेटीचा 6-3, 6-3 असा फडशा पाडला. त्याची पुढील लढत 11 व्या मानांकित ग्रिगोर डिमिट्रोव्हशी होईल. डिमिट्रोव्हने आठव्या मानांकित ह्युबर्ट हुरकाझवर 3-6, 6-3, 7-6 (7-3) अशी मात केली. टायब्रेकरमध्ये हुरकाझने नेटला पायाने स्पर्श केल्याबद्दल त्याला दंड करण्यात आला. मेदवेदेव्हची पुढील लढत निकोलस जॅरीशी होईल. जॅरीने सातव्या मानांकित कॅस्पर रुडचे आव्हान 7-6 (7-3), 6-3 असे संपुष्टात आणले. दुसरा मानांकित यानिक सिनरनेही उपांत्यपूर्व फेरी गाठताना ख्रिस्तोफर ओकॉनेलवर 6-4, 6-3 अशी मात केली. याशिवाय टॉमस मॅकहॅकने मॅटेव अरनाल्डीला 6-3, 6-3 असे हरविले. त्याची उपांत्यपूर्व लढत सिनरशी होईल.

Advertisement

रायबाकिना, अझारेन्का उपांत्य फेरीत

महिला एकेरीत चौथ्या मानांकित इलेना रायबाकिनाने आठव्या मानांकित मारिया सॅकेरीचा 7-5, 6-7 (4-7), 6-4 असा पराभव करून उपांत्य फेरीत स्थान मिळविले. अतिशय अटीतटीची झालेली ही लढत 2 तास 48 मिनिटे रंगली होती. दोन वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकलेल्या बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेन्कानेही उपांत्य फेरीत स्थान मिळविताना युलिया पुतिनत्सेव्हाचा 7-6 (7-4), 1-6, 6-3 असा पराभव केला. या मोसमात उपांत्य फेरी गाठण्याची अझारेन्काची ही दुसरी वेळ आहे. मागील वर्षी फक्त एकाच स्पर्धेत तिला उपांत्य फेरी गाठता आली होती. तिने येथील स्पर्धा एकंदर तीन वेळा जिंकली आहे.

Advertisement
Tags :
×

.