जेलबाहेर पडताच ईडीकडून आझम खान यांना अटक
वृत्तसंस्था/ रामपूर
समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करूनही अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) एका पथकाने त्यांना रामपूर तुरुंगातून बाहेर पडताच ताब्यात घेतले. दुहेरी पॅन कार्ड प्रकरणात उच्च न्यायालयाने आझम खान आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांना जामीन मंजूर केला होता. यानंतर त्यांच्या सुटकेची आशा निर्माण झाली होती. मात्र, तुरुंगाबाहेर ईडीने सापळा रचत आझम खान यांना अटक केल्यामुळे त्यांच्या सुटकेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने रामपूर तुरुंगाबाहेर ताब्यात घेतले. ईडीचे पथक निमलष्करी दलांसह आझम खान यांना ताब्यात घेण्यासाठी दाखल झाले होते. रामपूर तुरुंगाबाहेर ईडीची सुमारे तीन वाहने कारवाईदरम्यान तैनात होती.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने माजी कॅबिनेट मंत्री मोहम्मद आझम खान आणि त्यांचे पुत्र, माजी आमदार अब्दुल्ला आझम खान यांना दोन पॅन कार्ड प्रकरणांमध्ये दिलासा दिला होता. त्यांच्या शिक्षेवर स्थगिती, शिक्षेचे निलंबन आणि अंतरिम जामिनासाठी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने यापूर्वी आपला निकाल राखून ठेवला होता. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये रामपूरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी आझम खान आणि अब्दुल्ला आझम यांना फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर आणि गुन्हेगारी कट रचल्याबद्दल दोषी ठरवले होते. या प्रकरणात 2019 मध्ये भाजप नेते आकाश सक्सेना यांनी एफआयआर दाखल केला होता. त्यात अब्दुल्ला यांनी वेगवेगळ्या जन्मतारखा असलेले दोन पॅन कार्ड वापरून अवाजवी लाभ मिळवल्याचा आरोप करण्यात आला होता.
