आझम खान यांच्यासह पुत्रालाही 7 वर्षांची शिक्षा
बनावट पॅन कार्ड प्रकरणात दोषी : 50 हजार दंडही ठोठावला
वृत्तसंस्था/ रामपूर
समाजवादी पार्टीचे नेते आझम खान आणि त्यांचा मुलगा अब्दुल्लाह खान याला प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रामपूर खासदार-आमदार न्यायालयाने सोमवारी दोघांनाही बनावट पॅन कार्ड प्रकरणात दोषी ठरवले. त्यानंतर लगेचच शिक्षा जाहीर करण्यात आली. न्यायालयाने प्रत्येकी 50,000 रुपये दंडही ठोठावला. निकालानंतर पोलिसांनी आझम खान आणि अब्दुल्लाह याला कोर्टरूममध्येच ताब्यात घेतले. पोलिसांनी दोघांनाही कडक सुरक्षेत न्यायालयापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या रामपूर तुरुंगात नेले.
रामपूर खासदार-आमदार न्यायालयाने सुनावलेला हा निकाल आझम खान यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या 104 खटल्यांपैकी एक आहे. आतापर्यंत न्यायालयाने 11 प्रकरणांमध्ये निकाल दिले आहेत. आझम खान यांना यापैकी सहा प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. तर पाच प्रकरणांमध्ये त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आझम खान यांची अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच 23 सप्टेंबर रोजी सीतापूर तुरुंगातून सुटका झाली होती. तर त्यांचा मुलगा अब्दुल्ला नऊ महिन्यांपूर्वीच हरदोई तुरुंगातून बाहेर पडला होता.
बनावट पॅन कार्ड प्रकरण 2019 मधील आहे. रामपूरमधील भाजप नेते आकाश सक्सेना यांनी दोघांविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आझम यांनी त्यांचा मुलगा अब्दुल्ला निवडणूक लढवू शकेल यासाठी दोन वेगवेगळ्या जन्म प्रमाणपत्रांवर आधारित दोन पॅन कार्ड मिळवल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या 1 जानेवारी 1993 या मूळ जन्मतारखेनुसार अब्दुल्ला 2017 च्या निवडणुकीत लढण्यास अपात्र होता. कारण तो त्याप्रसंगी 25 वर्षांचा झाला नव्हता. त्यामुळे आझम खान यांनी जन्मवर्ष 1990 असलेले दुसरे पॅन कार्ड मिळविले होते.
विविध कलमांखाली शिक्षा
आझम खान आणि अब्दुल्ला याला कलम 467 (कागदपत्रांची खोटी माहिती) अंतर्गत सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांना कलम 120 ब (गुन्हेगारी कट रचणे) अंतर्गत एक वर्षाची शिक्षा, कलम 468 (फसवणूक करण्याच्या उद्देशाने खोटी माहिती देणे) आणि 420 (फसवणूक) अंतर्गत प्रत्येकी तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच न्यायालयाने त्यांना कलम 471 अंतर्गत दोन वर्षांची शिक्षा सुनावली, असे भाजप नेते आकाश सक्सेना यांचे वकील संदीप सक्सेना यांनी सांगितले.
