आयुष्मान भारत ई कार्ड नोंदणी लाभदायी
कोल्हापूर :
आयुष्मान भारत ई-कार्डसाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी जवळच्या आरोग्य केंद्राकडे संपर्क साधावा असे आवाहन प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी केले आहे. या आयुष्मान भारत ई-कार्ड अंत्योदय, प्राधान्य, केशरी व पांढरे रेशनकार्ड धारक पात्र होवू शकतात. या नागरीकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.
70 वर्षावरील जेष्ठ नागरीक, सीएपीएफ, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पीएम केअर, एसईसीसी 2011, पैएमजीकेवाय गोल्डन कार्ड धारक असावा. आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन रेशनकार्ड, 12 अंकी नंबर आधार कार्ड नंबर व त्यास सलग्न मोबाईल नंबर स्वत: लाभार्थी असणे आवश्यक आहे. हे कार्ड स्वत: लाभार्थी तसेच आशा वर्कर, रेशन धान्य दुकानदार, कॉमन सर्व्हिस सेंटर, योजनेत अंगीकृत असलेल्या रुग्णालयातील आरोग्यमित्र मार्फत काढता येईल. आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना दिनांक 23 सप्टेंबर 2018 रोजीपासून भारत सरकारकडून सुरु करण्यात आली. या योजनेत समाविष्ट केलेले कुटुंबे अनुक्रमे ग्रामीण आणि शहरी भागांसाठी समाजिक, आर्थिक, जातनिहाय, जनगणना 2011 च्या वंचित आणि व्यावसायिक निकषांवर आधारीता होती.
ही योजना 2018 ते 20 या दरम्यान महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रित पणे राबविण्यात आली. या एकत्रीत योजनेत शासनाने दिनांक 26 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये सुधारणा केल्या. त्यानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये 996 आजारांच्या उपचाराकरीता प्रती कुटुंब प्रती वर्ष दीड लाख रुपयांचे विमा संरक्षण पुरविले जात होते. तसेच आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमधून 1209 आजारांच्या उपचारासाठी प्रती कुटुंब प्रती पाच लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण लागू आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारने 28 जुलै 2023 रोजी राज्यातील सर्व कुटुंबांसाठी महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दिनांक 1 जुलै 2024 पासून विस्तारित कार्यक्षेत्रासह एकात्मिक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेमध्ये अंगीकृत रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असलेल्या द्वितीय अणि तृतीय प्रकारच्या आजारासाठी रुग्णलयात दाखल होण्यापासून ते घरी सुट्टी होईपर्यंत प्रती वर्षी प्रती कुटुंब पाच लाख रुपयांपर्यंत रोखरहित दर्जेदार वैद्यकीय सेवा प्रदान करते. नवीन अंमलबजावणीनुसार या योजनेत 1356 आजार समाविष्ट आहेत. यापैकी 1237 आजार खाजगी रुग्णालयास व 119 आजाराचे उपचार सरकारी रुग्णालयास राखीव आहेत. तसेच 262 प्रकारच्या उपचारानंतर मोफत फेरतपासणीसाठी पॅकेज केले आहे.