आयुषी, सान्वी, शिवाली, तन्वी राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र
बेळगाव : बिदर येथे शिक्षक खात्यातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत 17 वर्षाखालील गटात बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या डीपी संघाला बेंगळूर विभागाकडून पराभव पत्करावा लागला. आयुषी गोडसे, सान्वी मांडेकर व समिष्का पुजारी तर प्राथमिक गटात शिवाली पुजारी व तन्वी वर्णुलकर यांची राष्ट्रीय एसजीएफआय स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली आहे. बिदर येथे झालेल्या या स्पर्धेत 17 वर्षाखालील गटात अंतिम सामना बेंगळूर विभागीय संघाशी झाला. या सामन्यात बेंगळूरचे अव्वल मानांकित खेळाडूंनी 2-1 अशा सेट्समध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले. बेळगाव विभागातर्फे आयुषी गोडसे व सान्वी मांडेकर यांनी उत्तम खेळाचे प्रदर्शन केले.
कडव्या लढतीनंतर आयुषी गोडसे, सान्वी मांडेकर यांची एसजीएफआय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. 14 वर्षाखालील प्राथमिक गटात बेळगाव विभागीय संघाने विजेतेपद पटकाविले. या संघातील शिवाली पुजारी, तन्वी वर्णुलकर या खेळाडुंचीही राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आयुषी गोडसेने गतवर्षीसुद्धा एसजीएफआय स्पर्धेत सहभाग घेऊन यश संपादन केले होते. त्याचप्रमाणे राष्ट्रीय टेटे स्पर्धेतसुद्धा चमक दाखवली होती. या स्पर्धेत तिने रौप्यपदक पटकाविले होते. यापूर्वी आयुषीने बेंगळूरच्या अव्वल मानांकित टेबल टेनिसपटूंवर मात केली होती. तिच्या या उत्तम खेळाची दखल घेऊन तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सान्वी मांडेकरनेसुद्धा राष्ट्रीय स्पर्धेत चमक दाखवली होती. या सर्व खेळाडुंना डीपी स्कूलच्या मुख्याध्यापिका रोसम्मा जोसेफ, सिल्वीया डिलीमा यांचे मार्गदर्शन मिळत आहे.