आयुश शेट्टीचा लि फेंगला पराभवाचा धक्का
वृत्तसंस्था, निंगबो, चीन
भारताचा उदयोन्मुख स्टार बॅडमिंटनपटू आयुश शेट्टीने शानदार प्रदर्शन करीत येथे सुरू असलेल्या बॅडमिंटन आशियाई चॅम्पियनशिपमध्ये जागतिक क्रमवारीत 7 व्या स्थानावर असणाऱ्या व हाँगकाँग ओपन 2025 स्पर्धा जिंकणाऱ्या चीनच्या लि शि फेंगचा धक्कादायक पराभव करून सनसनाटी निर्माण केली.
माजी जागतिक तिसऱ्या मानांकित लि फेंगने दोन्ही गेम्समध्ये जोरदार सुरुवात केली होती. पण या गेम्सच्या उत्तरार्धात आयुशने वर्चस्व राखत फेंगला नमविले आणि उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. पहिल्या गेममध्ये आयुशने झुंज देत पेंगला 4-4 वर गाठले आणि 7-7 पर्यंत फेंगने किंचित सरस कामगिरी केली. यानंतर मात्र यूएस ओपन 2025 च्या चॅम्पियनने नियंत्रण मिळविले फेंगला मागे टाकत हा गेम 21-13 असा घेतला. दुसऱ्या गेममध्ये याच पद्धतीने रंगला. फेंगने प्रारंभी वर्चस्व राखले. त्याने आयुशवर दडपण आणत सामन्याच्या मध्यापर्यंत आघाडी घेतली होती. मात्र आयुशने अनेका बरोबरी साधल्यानंतर वेग वाढवला आणि 13-13 नंतर सलग सहा गुण घेतले आणि 21-16 असा सामना संपवत आगेकूच केली. 51 मिनिटे ही लढत रंगली होती.
1965 मध्ये पुरुष एकेरीत दिनेश खन्नाने सुवर्ण मिळविले होते तर 2023 मध्ये सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनीही पुरुष दुहेरीचे सुवर्णपदक मिळविले होते. भारताची या स्पर्धेतील ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे.
मंगळवारी या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताची मिश्र दुहेरीची जोडी तनिशा व्रॅस्टो व ध्रुव कपिला यांनी विजयी सुरुवात करताना थायलंडच्या फुवानात हॉर्बनल्युकित व बेनयापा ऐमसार्द यांच्यावर 21-14, 11-21, 21-15 असा विजय मिळविला. ध्रुव-तनिशाची पुढील लढत मलेशियाच्या चेंग टँग जी व तोह ई वेई यांच्याशी होईल. मिश्र दुहेरीच्या अन्य लढतीत भारताच्या अशित सूर्या-अमृता प्रमुथेश, रोहन कपूर-रुत्विका ग•s यांना पराभवाला सामोरे जावे लागले.