For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कृष्ण मोहन आता ट्रस्टचे हंगामी महासचिव अयोध्येतील बैठकीत एकमताने निर्णय, चंपत राय, अनिल मिश्रा यांचे राजीनामे मंजूर

11:17 PM Jul 06, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
कृष्ण मोहन आता ट्रस्टचे हंगामी महासचिव अयोध्येतील बैठकीत एकमताने निर्णय  चंपत राय  अनिल मिश्रा यांचे राजीनामे मंजूर
Advertisement

► वृत्तसंस्था अयोध्या
अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील देणगी अपहाराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची बैठक सोमवारी संपन्न झाली. काही दिवसांपूर्वी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी दिलेले राजीनामे या बैठकीत स्वीकारण्यात आले. आता चंपत राय यांच्या जागी कृष्ण मोहन यांची ट्रस्टचे हंगामी किंवा अंतरिम महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कृष्ण मोहन यांनीच राम मंदिरातील देणगी अपहार प्रकरणात एफआयआर दाखल केले होते.
राम मंदिर ट्रस्टची बैठक अंदाजे तीन तास चालली. ट्रस्टची ही पहिलीच बैठक राम मंदिर परिसरात झाली. यापूर्वी बैठका अयोध्या धाममधील मणिरामदास छावणीत होत असत. देणगी अपहारामुळे निर्माण झालेल्या गोपनीयतेमुळे ही बैठक मंदिर परिसरात घेतल्याचे वृत्त आहे. दरम्यान, चंपत राय यांच्याबाबत निर्णय घेण्यापूर्वी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास यांनी ‘जो कोणी पापात गुंतलेला असतो त्याला शिक्षा होतेच.’ असे सूचक वक्तव्य केले होते.

Advertisement

कृष्ण मोहन हे हरदोई जिह्यातील शहाबाद विधानसभा मतदारसंघातील चंद्रपूर गावचे रहिवासी आहेत. सध्या ते हरदोई शहरातील सिनेमा रोडवरील आपल्या निवासस्थानावरून समाजकार्यात सक्रिय आहेत. ते भारतीय वन सेवेतील माजी अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्र केडरमध्ये सेवा बजावली आहे. ते हरदोईचे रहिवासी असून सप्टेंबर 2025 मध्ये त्यांची ट्रस्टचे नवीन विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.

कामेश्वर चौपाल यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर ते हरदोई जिह्यात समाजकार्यात गुंतले आहेत. आता राम मंदिर ट्रस्टने त्यांची सदस्य म्हणून एकमताने निवड करतानाच तूर्तास महासचिव पदाची जबाबदारीही दिली आहे.
ट्रस्टच्या बैठकीला कोण उपस्थित होते?
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या 14 सदस्यांपैकी नऊ सदस्य सोमवारच्या महत्त्वाच्या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होते. दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारांच्या नामनिर्देशित सदस्यांनी ऑनलाइन उपस्थिती नोंदवली. बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित असलेल्यांमध्ये ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास, खजिनदार स्वामी गोविंद देव गिरी, ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन, दिनेंद्र दास, शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती, परमानंद गिरी महाराज आणि स्वामी विश्वप्रपन तीर्थजी महाराज यांचा समावेश होता.

Advertisement

काही सदस्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही बैठकीत सामील झाले, तर ट्रस्टचे सदस्य चंपत राय आणि अरविंद मिश्रा अनुपस्थित होते. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) संजय प्रसाद हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्हर्च्युअली सहभागी झाले होते.
विश्वस्तांना एसआयटीच्या तपासावर विश्वास
राम मंदिर ट्रस्टच्या बैठकीत उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीने केलेल्या तपासावर विश्वासही व्यक्त करण्यात आला. राम मंदिराच्या देणगी चोरीच्या प्रकरणाने चर्चेला सुरुवात झाली. देणगीच्या चोरीमुळे ट्रस्ट, रामभक्त आणि सामान्य जनतेच्या भावना दुखावल्या आहेत, असे बहुतेक विश्वस्तांनी सांगितले. या ट्रस्टच्या बैठकीत सदस्यांनी अयोध्येच्या नावलौकिकाला पोहोचलेल्या धक्क्याबाबत चिंता व्यक्त केली. राजीनामा हा विषय अजेंड्यावर अग्रस्थानी आहे, परंतु मोठ्या प्रमाणावर पसरणारी चुकीची माहिती हा मुख्य मुद्दा उपस्थित करण्यात आला.

महंत नृत्य गोपाल दास यांचे पत्र
ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी ‘श्री रामलल्ला सरकारजींच्या मंदिरातून देणग्यांची चोरी झाल्याने मला खूप दु:ख झाले आहे. ज्या कोणी हे पाप केले आहे, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. मला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. ते या पापात सामील असलेल्या प्रत्येकाला शिक्षा देतील.’ असे म्हटले आहे. त्यांनी भक्तांच्या श्रद्धेबद्दल भाष्य करताना ‘हा कोट्यावधी हिंदूंच्या श्रद्धेचा प्रश्न आहे आणि माझी विनंती आहे की कोणीही वैयक्तिक फायद्यासाठी या प्रकरणात राजकारण करू नये.’ असे आवाहनही केले आहे.

Advertisement
Tags :

.