अयोध्या खासदाराच्या पुत्रावर अपहरणाचा आरोप
समाजवादी पक्षाचा नेता अडचणीत
वृत्तसंस्था/ अयोध्या
अयोध्या लोकसभा मतदारसंघात विजय मिळवून चर्चेत आलेले सप नेते अवधेश प्रसाद हे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पसंतीचे नेते ठरले आहेत. आता यावेळी अवधेश प्रसाद हे पुन्हा चर्चेत आहेत, परंतु आता ते स्वत:च्या मुलामुळे अडचणीत आले आहेत. खासदार पुत्र अजीत विरोधात युवकाच्या अपहरणाचा गुन्हा नोंद झाला आहे.
हे प्रकरण जमीन वादाशी निगडित आहे. अयोध्येतील पलिया गावचे रहिवासी रवि तिवारी यांनी शीतला प्रसाद यांच्याकडून जमीन खरेदी करण्यासाठी व्यवहार केला होता. याकरता 1 लाख रुपयांची अॅडव्हान्स देखील देण्यात आली होती. परंतु नंतर या जमिनीची मालकी अजित प्रसाद आणि लाल बहादुर यांच्या नावावर करण्यात आली. याप्रकरणी रवि तिवारीने पोलिसांकडे धाव घेतली होती.
रवि तिवारी यांचे या पार्श्वभूमीवर अजित प्रसादने अपहरण केले होते. अजित प्रसाद आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रवि तिवारीला बळजबरीने गाडीत बसविले आणि त्याच्यावर पिस्तूल रोखले होते. रवि तिवारीला जबर मारहाण करण्यात आली होती.