28 लाख दिव्यांनी उजळली अयोध्या
जागतिक विक्रमाची नोंद : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत दीपोत्सव-आरती
वृत्तसंस्था/ अयोध्या
रामनगरी अयोध्येत रविवारी नववा दीपोत्सव साजरा करण्यात आला. राम की पैडीसह सरयू नदीकाठी 56 घाटांवर 28 लाखांहून अधिक दिवे लावण्यात आले. याप्रसंगी 26 लाख 11 हजार 101 दिव्यांचा जागतिक विक्रम प्रस्थापित झाल्याची घोषणा करण्यात आली. या कामगिरीचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सची टीम अयोध्येत उपस्थित होती. 15 मिनिटांत 26 लाखांहून अधिक दीप पेटविण्यासाठी राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठातील 32,000 स्वयंसेवक या कामात गुंतले होते. गेल्या दोन दिवसांपासून चाललेल्या या प्रयत्नांना विश्वविक्रमाच्या माध्यमातून मोठे यश प्राप्त झाले आहे.
अयोध्या दीपोत्सवादरम्यान सरयू नदीकाठी 56 घाटांवर 28 लाखांहून अधिक दिवे लावण्यात आले. राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठातील स्वयंसेवक रामनगरीला दिव्यांच्या प्रकाशाने उजळवण्यात गुंतले होते. अयोध्येतील रामघाटावर दिवे लावण्यास सुरुवात झाली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटात सरयू नदीकाठी असलेल्या सर्व 56 घाटांवर 26 लाखांहून अधिक दिवे लावण्यात आले. त्यानंतर लेसर आणि लाईट शो सुरू करण्यात आला. या कार्यक्रमापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येत पोहोचले हाते. त्यांनी रामकथा पार्क हेलिपॅडवर पुष्पक विमानाच्या रुपात आलेल्या हेलिकॉप्टरमधून राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या मूर्तींचे स्वागत केले. यादरम्यान भारत मिलाप सोहळ्यासह राम-जानकीची पूजा देखील करण्यात आली.
रामकथा पार्कच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी श्री रामांचा राज्याभिषेक केला. राज्याभिषेक सोहळ्यादरम्यान रामकथा पार्क जय श्रीरामच्या जयघोषाने दुमदुमले होते. मुख्यमंत्र्यांनी श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि गुरु वशिष्ठ यांना तिलक आणि हार घातल्यानंतर आरती केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी श्री राम जन्मभूमी मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेतले.
दीपोत्सव हा श्रद्धा-आदराचे प्रतीक
राज्याचे पर्यटन आणि संस्कृती मंत्री जयवीर सिंह हेसुद्धा अयोध्येतील दीपोत्सवाला उपस्थित होते. 2017 मध्ये पहिल्यांदाच 1,71,000 दिवे लावण्यात आले. आता गेल्या नऊ वर्षात त्यात प्रगती होत असून दरवर्षी नवे विक्रम प्रस्थापित केले जात असल्याचे ते म्हणाले. यंदाच्या दीपोत्सवात 26 लाखांहून अधिक दिवे लावून जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पहिल्यापासून नवव्या वर्षापर्यंत दिव्यांची संख्या जवळपास 15 पटीने वाढली आहे. हे भगवान श्री रामांवरील श्रद्धा आणि आदराचे प्रतीक असल्याचे ते पुढे म्हणाले.
ऑनलाईन सेवाही उपलब्ध
अयोध्येतील दीपोत्सव पाहण्याची सुविधा सोशल मीडियावरही उपलब्ध करण्यात आली होती. एआर अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. हे अॅप सर्व वयोगटातील वापरकर्त्यांसाठी सहज उपलब्ध होण्यासाठी डिझाइन केले आहे. कथा, भक्ती आणि नवोपक्रम यांचा मिलाफ असलेले हे अॅप अयोध्येतील सोहळ्याला एका चैतन्यशील डिजिटल जगात रुपांतरित करते. जगातील कुठूनही लोक व्हर्च्युअल दीपदानद्वारे दिवे लावून उत्सवात सहभागी होऊ शकतात. हे अॅप उत्तर प्रदेश पर्यटन विभागाच्या विकसित उत्तर प्रदेश 2047 च्या दृष्टिकोनाकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आध्यात्मिक वारसा आणि नवोपक्रमाचे हे मिश्रण तरुणांमध्ये अभिमान, सहभाग आणि सांस्कृतिक संबंधाची एक नवीन भावना जागृत करते.