सावंतवाडीत २१ रोजी 'अयोध्या' महानाट्य
भाजपच्या माध्यमातून आयोजन
सावंतवाडी - प्रतिनिधी
अयोध्येतील 'राम मंदिर ' लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंधू संकल्प अकादमी व सागर एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून रविवार २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीतील आरपीडी हायस्कूलच्या पटांगणावर भारत वर्षातील अलौकिक धर्म युद्धावर आधारित 'अयोध्या ' हे महानाट्य भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आहे. हे महानाट्य विनामूल्य असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांनी केले.सावंतवाडी येथील विधानसभा मतदारसंघ संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, आंबोली मंडल अध्यक्ष रवी मडगावकर, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी शहर अध्यक्ष ॲड. संजू शिरोडकर, माजी नगरसेवक तथा भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य मनोज नाईक, माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, गुरु मठकर, परीक्षेत मांजरेकर, अमित परब, दिलीप भालेकर, विनोद सावंत, केतन आजगावकर, हेमंत बांदेकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.अयोध्या हे महानाट्य राम मंदिरच्या पाचशे वर्षांच्या इतिहासावर आधारित आहे. मुघल बादशहा 'बाबराने राम मंदिर पाडल्यानंतर ते राम मंदिराच्या निर्माणापर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम या महानाट्यात दाखविण्यात आलेला असून अतिशय सुंदर व उत्तम असे लिखाण व दिग्दर्शन तसेच कलाकारांची निवड व सादरीकरण सर्वोत्तम असल्याने हे नाटक अतिशय प्रेक्षणीय आहे, असेही त्यांनी सांगितले.या महानाट्याचा पहिला प्रयोग वेंगुर्ला येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून झाला असून २१ जानेवारी रोजी भाजप विधानसभा प्रमुख तसा माजी आमदार राजन तेली यांच्या सौजन्याने सावंतवाडीत हा प्रयोग होत आहे. या नाट्यप्रयोगाच्या पूर्वी बाबरी मशीद पतन व राम मंदिराच्या उभारणीसाठी ज्या कारसेवकांनी सहभाग घेतला होता त्या कार सेवकांचा यथोचित सत्कार करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.दरम्यान, राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गावागावात असलेल्या मंदिरांचे सुशोभीकरण रंगरंगोटी तसेच परिसर स्वच्छता करण्यात येत आहे. गावागावात भजन कीर्तन महाप्रसाद असे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यातील या मंदिरांना २१ जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे भेट देणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. एकंदरीतच या निमित्ताने संपूर्ण देशभर दिवाळी साजरी होत आहे. आपल्या हयातीत राम मंदिराचे निर्माण व उद्घाटन होत असल्याने सर्वच जनतेत आनंदाचे व समाधानाचे वातावरण असून जनता उत्स्फूर्तपणे या उत्सवात सहभागी होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून हे कार्य यशस्वी झाल्यामुळे यात कोणी श्रेयवाद करण्याचा विषयच येत नाही. काँग्रेसला ७० वर्षात जे शक्य झालं नाही ते पंतप्रधान मोदींनी आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात करून दाखविले आहे. त्यामुळे यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतेही राजकारण नसून काँग्रेसने तशी टीका करू नये जनतेला सर्व ज्ञात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.