24.60 लाख दिव्यांनी अयोध्यानगरी तेजोमय
नव्या विश्वविक्रमाची नोंद : रामनगरीने रचला इतिहास : 51 घाटांवर 21 लाखांहून अधिक दिवे लावण्याचे उद्दिष्ट साध्य
वृत्तसंस्था/ अयोध्या
दीपोत्सवानिमित्त शनिवारी सायंकाळी लाखो दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाली होती. यंदा येथील घाटांवर तब्बल 24.60 लाख दिवे लावून नवा विक्रम नोंदवण्यात आला. अयोध्येत यंदा सलग सातव्या वर्षी दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी 51 घाटांवर 21 लाख दिवे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, त्यापेक्षाही साडेतीन लाखांहून अधिक दिवे लावत जागतिक विक्रम नोंदवण्यात आला. या दिपोत्सवापूर्वी सकाळी रामायण या विषयावर आधारित झांकी काढण्यात आली. यादरम्यान पाऊसही सुरू झाला. कलाकार पावसात भिजत नाचताना दिसले.
सरयूच्या काठावर मागच्यावेळी 15 लाख 76 हजार दिवे लावण्याचा विक्रम गिनीज बुकमध्ये नोंदवला गेला होता. यंदा त्यात मोठी भर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी दीपोत्सवात केवळ राम की पौडीवर 21 लाख दिवे प्रज्वलित करण्याची तयारी केली जात होती. मात्र, विश्वविक्रमी पातळी गाठण्यासाठी अतिरिक्त 3 लाख 60 हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले. रामलल्लाच्या दरबारात शनिवारी संध्याकाळी पहिला दीप प्रज्वलित होताच संपूर्ण अयोध्या उजळून निघण्यास सुरुवात झाली. दीपमाला सतत तेवत ठेवण्यासाठी स्वयंसेवक आणि भक्तांनी प्रचंड मेहनत घेतली. शनिवारी झालेल्या या दीपोत्सवात रामनगरी दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाली. दिवाळीनिमित्त जणू स्वर्गच पृथ्वीवर अवतरल्यासारखी सजावट करण्यात आली होती. चकाकणारे रस्ते, एकाच रंगात रंगवलेल्या इमारती आणि आकर्षक रोषणाई सोबतच रामकथेवर आधारित 15 तोरण आणि अनेक स्वागतद्वार अयोध्येचे सौंदर्य वाढवत होते. घरांच्या, दुकानांच्या दारावर आणि भिंतींवर रामकथांची प्रतीके रंगवण्यात आली होती.
भव्य शोभायात्रा
अयोध्येतील दीपोत्सवासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची मुख्य उपस्थिती लाभली. याचदरम्यान प्रभू श्रीराम पुष्पक विमानाच्या रूपात हेलिकॉप्टरमधून अयोध्येला पोहोचले. मुख्यमंत्री योगी आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनी श्रीरामाचा राज्याभिषेकही केला. या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी सुमारे पाच हजार भाविक रामकथा पार्कवर उपस्थित होते. यावेळी सरयू पुलावर 20 मिनिटे हरित फटाके फोडण्यात आले. सरयू किनाऱ्यावरून मुख्यमंत्री आणि इतर पाहुण्यांनी फटाक्मयांची आतषबाजी अनुभवली.
दिवसभर लगबग
शनिवारी सकाळपासून दिव्यांमध्ये तेल आणि वात घालण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. सायंकाळी सर्व घाटांवर दिवे लावण्यात आले. यादरम्यान स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. दिव्यात तेल भरण्यासाठी एक लिटर तेलाची बाटली दिली जात होती. प्रत्येक दिव्यामध्ये 30 मिली तेल घालण्यात आले होते. घाटावर तेल पडू नये यासाठीही दिव्याचा वरचा भाग काहीसा रिकामा ठेवला जात होते. दिव्यात तेल टाकल्यानंतर वातीच्या पुढील भागावर कापूर पावडर लावल्यामुळे स्वयंसेवकांना दिवे लावणे सोपे झाले होते. रात्री उशिरापर्यंत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची टीम दिवे मोजण्यात व्यस्त होती.