अयोध्या... विकासाचा नवीन अध्याय !
22 जानेवारी, 2024...अयोध्येसह संपूर्ण भारतात घुमला तो ‘जय श्रीरामा’चा घोष...अर्थातच या रामजन्मभूमीत श्रीरामाचं मंदिर हे मुख्य आकर्षण असलं, तरी त्यानिमित्तानं ही ‘आध्यात्मिक राजधानी’ बनण्याच्या दिशेनं पावलं टाकणारी नगरी विकासाच्या ‘एक्प्रेस वे’वर धावू लागलीय. त्याअंतर्गत या क्षेत्राचा पूर्णपणे कायापालट घडविणारे अनेक प्रकल्प साकारू लागलेत...
गेल्या हजारो वर्षांत अयोध्येला जे दिसलं नव्हतं त्याचं दर्शन घडलंय ते गेल्या 10 महिन्यांत... रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेचा भव्य सोहळा नुकताच पार पडलाय आणि लोकांना पाहिली ती तब्बल 50 हजार कोटी रुपये ओतून झगमणारी, कायापालट झालेली अयोध्या नगरी... हजारो अभियंते, विविध कुशल कामगार अन् अवाढव्य यंत्रसामग्री यांच्या जोरावर शहर अक्षरश: झपाट्यानं बदलत चाललंय...राममंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता ‘जन्मभूमी पथ’ अत्यंत सुंदर बनविण्यात आलाय. सुमारे 3 हजार 500 घरांच्या दर्शनी भागाला मोहक रूप देण्यात आलंय, तर सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या संपूर्णपणे बदलण्यात आल्याहेत...
अयोध्येचं नवीन रेल्वे स्थानक तर ओळखणं सुद्धा कठीण बनलंय...शरयू नदीवर सहा घाटांची निर्मिती करण्यात आलीय नि त्यांना राम, लक्ष्मण, भरत, हनुमान, गरुड, जटायू अशी नावं ठेवलीत...भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 70 किलोमीटर्सच्या ‘रिंग रोड’ची निर्मिती करण्यात सध्या गुंतलंय. थोडक्यात सांगायचं झाल्यास अयोध्येला भारताची ‘आध्यात्मिक राजधानी’ बनविण्याचं काम अक्षरश: नेटानं चाललंय...
अयोध्या बदलण्यास प्रारंभ झाला तो 2018 साली सरकारनं नवीन जिह्याची निर्मिती केल्यानंतर, तर विविध कामांनी गती घेतली ती रामजन्मभूमी-बाबरी मशिद वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर...सध्या अयोध्येच्या रस्त्यांवरील दिवे सौरऊर्जेवर चालतात, तर मंदिराभोवतालच्या पाच किलोमीटर व्यासाच्या परिसरात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यात आल्याहेत...गुप्तार घाट ते लक्ष्मण घाट हा 10.2 किलोमीटर्सचा रस्ता देखील लवकरच सौरऊर्जेच्या साहाय्यानं झगमगताना दिसेल अन् त्याची नोंद होईल ती जागतिक विक्रमात...
सहा वर्षांपूर्वी अयोध्या हे शरयूच्या काठावर वसलेलं फैझाबाद जिल्हयातील एक बकाल शहर होतं. अत्यंत घारणेरडे रस्ते आणि ठिकठिकाणी वाहणारं सांडपाणी यांनी चेहरा बिघडून टाकला होता. सध्या अयोध्येचा विकास चाललाय तो 2031 सालचा ‘मास्टर
प्लॅन’ व 2047 सालचा ‘डॉक्युमेंट’ यांच्या आधारे...पहिल्या आराखड्यात 134 चौरस किलोमीटर्स क्षेत्रात पसरलेल्या शहराचं रूप बदलण्यावर भर देण्यात आलाय, तर दुसऱ्यामध्ये व्यवसायांच्या विस्तारावर... ‘मास्टर
प्लॅन 2031’नुसार अयोध्येचा पुनर्विकास पूर्ण होईल तो 10 वर्षांच्या कालावधीत. प्रत्येक दिवशी सुमारे 3 लाख लोक भेट देतील अशी अटकळ बांधून त्यांची रोजची गरज भागवण्याच्या दृष्टीनं या पवित्र शहरातील सुविधा अद्ययावत करण्यासाठी 85 हजार कोटी ऊपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली जाईल...
रिअल इस्टेट फॉर्मात, जमिनीचे दर गगनात...
- गेल्या दोन वर्षांत अयोध्येला दर्शन घडलंय ते धुळीचं असं म्हटल्यास वावगं ठरू नये. याचं कारण तेथील ‘रिअल इस्टेट सेक्टर’नं अक्षरश: कात टाकलीय. सध्या बिल्डर काम नसल्यानं घरी बसलेला पाहायला मिळणार नाहीये...
- पंचतारांकित हॉटेलं, व्हिला, ‘रिटायरमेंट होम्स’, ‘गेस्ट हाऊसेस’, ‘होमस्टे’ यांची गर्दी तुफानी वाढणार अशी चिन्हं दिसू लागलीत. या पार्श्वभूमीवर जमिनींचे दर 25 ते 30 टक्क्यांनी वाढलेत. सध्या एका चौरस फुटाचा विचार केल्यास सहा ते सात हजार रु. असा दर चाललाय...
- 2017-18 वर्षात जमिनीच्या 5 हजार 962 व्यवहारांचं दर्शन घडलं होतं, तर 2023-24 आर्थिक वर्षाच्या नोव्हेंबरपर्यंतच ही संख्या 20 हजार 67 वर पोहोचली...खुद्द सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना देखील शरयू नदीच्या काठावर जमीन विकत घेण्याचा मोह आवरलेला नाही...
- रस्त्यांचं रुंदीकरण करण्यासाठी तब्बल चार हजार घरं नि दुकानं जमीनदोस्त करण्यात आलीत...
- अयोध्या विकास प्राधिकरणाचा 80 एकरांमध्ये नवीन गृहनिर्माण योजना राबविण्याचा बेत चाललाय, तर मुंबईचे डेव्हलपर अभिनंदन लोधा यांनी ‘लीला पॅलेस’सह विविध हॉटेल्स नि रिसॉर्ट्स यांच्याशी करार केलाय...
थोडक्यात महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ...
- पंतप्रधानांनी 30 डिसेंबर, 2023 या दिवशी उद्घाटन केलेल्या अयोध्येतील या विमानतळाचं टर्मिनल 65 हजार चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेलं असून धावपट्टीचा पहिला टप्पा 2 हजार 200 मीटर्सचा...
- आठ विमानं ठेवण्याची सोय अन् टर्मिनल इमारतीची क्षमता 500 प्रवाशांना सामावून घेण्याची. या विमानतळामुळं पर्यटनाला, व्यवसायांना व नोकऱ्यांना मोठा हातभार लागेल...
- दुसऱ्या टप्प्यात धावपट्टी 3700 मीटर्सवर नेण्यात येईल आणि तिथं ‘बोईंग 787’ नि ‘बोईंग 777’ यासारखी अवाढव्य विमानं सहज उतरू शकतील...
- हा विमानतळ देखील मंदिराप्रमाणं ‘नगारा’ पद्धतीनं बांधण्यात आलेला असून टर्मिनलच्या छपराला आधार देणाऱ्या खांबांवर रामायणातील विविध प्रसंग रेखाटण्यात आलेत...
मोठ्या संख्येनं हॉटेल्सची उभारणी...
- ‘ताज ग्रुप’ची ‘विवांता’ नि ‘जिंजर’ ब्रँड्सची दोन हॉटेल्स अयोध्येत अवतरणार असून ‘रेडिसनन’ व ‘आयटीसी’नं सुद्धा या नगरीच्या दिशेनं मोर्चा वळविलाय. एकंदरित तब् बल 125 हॉटेल्स उभी राहिलेली दिसतील. त्यात समावेश असेल तो भारतातील पहिल्यावहिल्या संपूर्ण शाकाहारी सप्ततारांकित हॉटेलचा...
- अयोध्येतील आदरातिथ्य क्षेत्रात 45 हजार 402 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असा अंदाज असून त्यामुळं प्रत्यक्ष वा अप्रत्यरक्षरीत्या नोकऱ्या मिळतील त्या सुमारे 30 हजार लोकांना...
- गेल्या काही आठवड्यांत ‘होमस्टे’साठी 1 हजार अर्ज आलेले असून दोन ‘रिव्हर क्रूझ’, 66 धर्मशाळा यासह बजेट हॉटेल्स नि पंचतारांकित हॉटेल्सची रांग तिथं पाहायला मिळेल...
भाविकांचा लोटतोय ओघ...
- अयोध्येला भेट देणाऱ्यांची संख्या 2019 सालच्या 3.5 लाखांवरून 2022 साली 2 कोटींवर पोहोचली, तर 2023 मध्ये सप्टेंबरपर्यंत 2.5 कोटी भाविकांनी तिथं भेट दिली...रामल्लाच्या प्रतिष्ठापनेनंतर केवळ दोन दिवसांत 5 ते 7 लाखांचा जनसागर तिथं लोटला होता...
- 2047 पर्यंत एका अंदाजानुसार, वर्षाला तब्बल 11 कोटी लोक अयोध्येची वारी करतील...
राज्यात विमानतळ उभारणीचा सपाटा...
- 2017 साली चार विमानतळ अस्तित्वात असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सध्या एकूण 10 विमानतळ असून 11 विमानतळांची निर्मिती चाललीय...त्यापैकी 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ असून त्यात समावेश अयोध्येच्या महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळासह वाराणसी, लखनौ, कुशीनगर आणि जेवर (नोएडा) इथं बांधकाम चालू असलेल्या आशिया खंडातील सर्वांत मोठ्या विमानतळाचा...
- अंतर्गत वाहतूक चाललीय ती आग्रा, प्रयागराज, गोरखपूर, बरेली, हिंडन (गाझियाबाद) अन् कानपूरमधील विमानतळांवरून... त्यांच्यासाठी ओतलेत 50 हजार कोटी रुपये...
त्यांच्यासाठी ओतलेत 50 हजार कोटी रुपये...
ग्रीनफिल्ड टाऊनशिप : 3 हजार कोटी रुपये...
लखनौ-गोरखपूर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना 1407 एकर परिसरात निर्मिती. निवासी व व्यावसायिक वापरासाठीच्या भूखंडांचा समावेश...व्यावसायिक टप्पा पूर्ण,..
विविध रस्ते : 10 हजार कोटी रुपये...
अयोध्येला उत्तर प्रदेशमधील विविध जिह्यांशी जोडण्यासाठी मार्गांची निर्मिती...
‘रामपथ : 850 कोटी रुपये...
13 किलोमीटरांचा साहदतगंज ते नया घाट रस्ता मंदिराला जोडण्याच्ंां काम. त्याचं रुंदीकरण करण्यात आलेलं असून हाच मार्ग लखनौ-अयोध्या-गोरखपूर राष्ट्रीय महामार्गाला श्रीरामाचं मंदिर व शरयू घाट यांना जोडेल. पहिला टप्पा पूर्ण...
मलनिस्सारण जाळं : 245 कोटी रुपये...
133.5 किलोमीटर्स परिसरातील सुमारे 20 हजार नवीन घरांना आधार मिळेल तो या नवीन जाळ्याचा. अंतिम टप्प्याचं काम चालू...
पार्किंग : 155 कोटी रुपये...
चार ठिकाणी 700 प्रवासी कार्सना उभी राहण्याची व्यवस्था. या पार्किंग संकुलात दुकानांचाही समावेश. तीन टप्पे पूर्ण, चौथ्याच्ंां काम चालू...
अयोध्या रेल्वेस्थानक : 240 कोटी रुपये...
काम पूर्ण...
सहा उ•ाणपूल : 550 कोटी...
रेल्वे जाळ्यासाठी उभारणी. काम पूर्ण, परंतु उद्घाटन होणं बाकी...
मंदिर संग्रहालय (खर्च जाहीर झालेला नाही)...
शरयू नदीच्या काठावर याची उभारणी होईल...
फाऊंटन पार्क : 150 कोटी रु....
निविदा जारी...
एअरो सिटी : 400 कोटी रु....
150 एकरमध्ये हा प्रकल्प साकारणार...
टेंट सिटी (खर्च जाहीर झालेला नाही)...
कामाचा आदेश जारी, सहा ठिकाणी त्यांचं दर्शन घडेल...
अयोध्या हाट (खर्च जाहीर झालेला नाही)...
कामाचा आदेश जारी...
वॅक्स म्युझियम : 2 कोटी रुपये...
कामाचा आदेश जारी...
राम हेरिटेज वॉक : 9.6 कोटी रुपये...
तीन महिन्यांत काम पूर्ण होणार...
सूर्यकांड : 24 कोटी रुपये...
योजना पूर्ण. प्रत्येक दिवशी सायंकाळी ‘लेसर लाईट शो’चं सादरीकरण होईल...
पंचवटी द्वीप (खर्च जाहीर झालेला नाही)...
शरयू नदीत निर्माण करण्यात येणार असलेलं कृत्रिम बेट...