भव्य सोहळ्यात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा; अचूकपणे साधला ‘अभिजित’ मुहूर्त
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व मान्यवर भारावले, देशभरात उत्साहाला उधाण
वृत्तसंस्था / अयोध्या
देवनगरी अयोध्येत साकारत असलेल्या भव्य राममंदिराच्या गर्भगृहात भगवान रामलल्लांच्या मूर्तीची ‘प्राणप्रतिष्ठा’ हिंदू धर्माच्या शास्त्रोक्त पद्धतीने, वेदमंत्रांच्या घोषात आणि मंगल ‘अभिजित’ मुहूर्तावर करण्यात आली आहे. अशा प्रकारे समस्त भारतीयांनी 500 वर्षांहून अधिक काळ सातत्याने आणि निर्धाराने केलेल्या संघर्षाची सुफळ सांगता झाली आहे. ‘प्राणप्रतिष्ठा’ कार्यक्रमाचे मुख्य यजमानपद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे होते. त्यांच्याच हस्ते हा सर्व धार्मिक समारंभ करण्यात आला. या वेळी गर्भगृहात या कार्यक्रमाचे मुख्य पुरोहित आचार्य गणेश्वरशास्त्री द्रविड, सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची उपस्थिती होती. सोमवारी दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी या समारंभाला प्रारंभ करण्यात आला. ‘प्राणप्रतिष्ठे’चा मुख्य कालावधी केवळ 84 सेकंदांचा होता. तो नेमकेपणाने साधत सर्व कार्यक्रम साधारणत: चाळीस मिनिटांमध्ये पूर्ण करण्यात आला.
या कार्यक्रमाची गेल्या कित्येक दिवसांपासून आतुरतेने प्रतीक्षा करणारी अयोध्यानगरी सोमवारी आनंदात अक्षरश: न्हाऊन निघाली होती. या नगरीत अनेक स्थानी कार्यक्रमाचे सजीव दर्शन घडविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमानंतर असंख्य लोकांनी प्रभू रामचंद्रांचा जयजयकार करत मार्गांवरून मिरवणुका काढल्या. भगवान रामलल्लांच्या ‘प्राणप्रतिष्ठा’ दर्शनाने आपण कृतकृत्य झालो आहोत, अशी भावना असंख्य अबालवृद्धांनी उत्स्फूर्तपणे व्यक्त केली.
मूर्तीची सजावट अद्भूत
गर्भगृहात पाच दिवसांपूर्वीच स्थापित करण्यात आलेल्या भगवान रामलल्लांच्या मूर्तीची नितांतसुंदर सजावट करण्यात आली होती. विविध प्रकारची पुष्पे, पर्णे आणि मौल्यवान अलंकारांनी मूर्तीला मढविण्यात आले होते. मूर्तीच्या मस्तकावरील सुवर्णमुकूट तिच्या मूळच्या अप्रतिम रुपाला अधिकच शोभा आणत होता. मूर्तीप्रमाणेच गर्भगृहाची सजावटही नेत्रांचे पारणे फेडणारीच होती.
संपूर्ण मंदीर सुशोभित
भव्य राममंदिराचीही या कार्यक्रमासाठी अत्यंत कलात्मक पद्धतीने सजावट करण्यात आली होती. आकर्षक पुष्परचना स्तभास्तभांवर होती. मंदिराच्या छतापासून पायऱ्यांपर्यंत विविध प्रकारची पुष्पे, पर्ण आणि लतावेलींची सजावट होती. याशिवाय मंदिराचे विविध मंडपही सुशोभित करण्यात आले होते.
अनेक मान्यवर उपस्थित
हा ऐतिहासिक ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळा ‘याची देही, याची डोळा’ पाहण्यासाठी आणि अनुभविण्यासाठी देशभरातून सर्व क्षेत्रांमधील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. या आमंत्रितांमध्ये कला, क्रिडा, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान आणि अन्य अनेक क्षेत्रांमधील व्यक्तींचा समावेश होता. या साऱ्यांनीच नंतर आपण भारावून गेलो असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
वेदमंत्रांच्या घोषात...
संपूर्ण ‘प्राणप्रतिष्ठा’ कार्यक्रम वेदमंत्रांच्या घोषात पारंपरिक पद्धतीने आणि धर्मशास्त्रीय नियमांचे सूक्षातीसूक्ष्म आचरण करुन करण्यात आला. विशेषत: मुहूर्त साधण्याच्या संबंधात तर काटेकोर दक्षता घेण्यात आली होती. कारण प्रत्यक्ष मुहूर्त केवळ 84 सेकंदांचा होता. त्यामुळे मुहूर्ताआधीचा प्रत्येक कार्यक्रम आणि धार्मिक विधी योग्य समयावरच पार पडणे आवश्यक होते. ही सर्व पथ्ये व्यवस्थितरित्या आणि समयबद्ध रितीने सांभाळण्यात आल्याचे या कार्यक्रमात दिसून आले आहे.
असे सजले होते भगवान रामलल्ला
- मस्तकावर नवरत्नजडित सुवर्णमुकूट, गळ्यात सुंदर रत्नांची माला
- कपाळावर उभे दुबोटी गंध, शुभ्र रंगाच्या गंधात भगवा पुंकुमतिलक
- गर्भरेशमी पितांबर, हाती सुवर्णाचे धनुष्यबाण, सुवर्णाचे कवचकुंडल
- भगवान रामल्लांचा कमरपट्टाही सुवर्णाचा, विविध पुष्पांचे हार, माला
- गळ्यापासून पावलांपर्यंत पोहचणारे चित्ताकर्षक रचनेचे पुष्पपर्णहार
- गर्भगृहाच्या शुभ्र-गुलाबी पार्श्वभूमीवर कृष्णवर्णाची मूर्ती नयनमनोहर