‘एडब्ल्यूएस’ जीडीपीमध्ये 23 अब्ज डॉलरचे देणार योगदान
वृत्तसंस्था/ मुंबई
अमेझॉन वेब सर्व्हिसेस (एडब्ल्यूएस) 2030 पर्यंत भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) 23.3 अब्ज डॉलरचे योगदान देण्याची योजना आखत आहे आणि दरवर्षी 1.31 लाखांहून अधिक नोकऱ्यांना देखील पाठिंबा देणार आहे, अशी कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी माहिती दिली आहे.
क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील कंपनी देशातील क्लाउड सेवा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी 2030 च्या अखेरीस 12.7 अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. एडब्ल्यूएसचे अध्यक्ष (भारत आणि दक्षिण आशिया) संदीप दत्ता हे मुंबईत एडब्ल्यूएस शिखर परिषदेला हजर राहिले होते. एडब्ल्यूएसचे अध्यक्ष (भारत आणि दक्षिण आशिया) संदीप दत्ता म्हणाले, ‘आपल्या सर्वांना माहित आहे की भारत एक ट्रिलियन डॉलरची डिजिटल अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. एडब्ल्यूएस म्हणून, आम्ही भारताप्रती आमची वचनबद्धता सतत वाढवत आहोत.’
जानेवारीमध्ये, कंपनीने महाराष्ट्रातील एडब्ल्यूएस आशिया-पॅसिफिक (मुंबई) प्रदेशात क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 8.3 अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याची योजना आखल्याचे सांगितले. भारतात एकूण 12.7 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची योजना कंपनीची आहे.