महामेळाव्यासाठी गावोगावी जागृती करणार
8 डिसेंबरला निषेध करणारच : तालुका म. ए. समितीच्या बैठकीत निर्धार
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावमधील मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारने बेळगावमध्ये सुवर्णविधानसौध निर्माण करून त्या ठिकाणी हिवाळी अधिवेशन घेण्यास प्रारंभ केला. परंतु, याला मराठी भाषिकांचा तीव्र विरोध असून 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला विरोध दर्शवून महामेळावा यशस्वी करणारच, असा निर्धार तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला.
शनिवारी मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीला तालुक्यातील म. ए. समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटत नसल्यामुळे 2004 साली महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू असतानाच कर्नाटक सरकारने बेळगावमध्ये सुवर्णसौध बांधून अधिवेशन घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे मराठी भाषिकांकडून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा भरवून प्रतिअधिवेशन घेतले जाते. पोलीस प्रशासनाकडे महामेळाव्यासंदर्भात परवानगीचे पत्र देण्यात आले आहे. या पत्रामध्ये शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश असून यापैकी एका ठिकाणी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. महामेळाव्यासाठी गावोगावी जागृती केली जाणार असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले. तसेच मोठ्या संख्येने मराठी भाषिकांनी उपस्थित राहून महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी आर. के. पाटील, मोनाप्पा पाटील, युवानेते आर. एम. चौगुले, आर. आय. पाटील, अनिल पाटील, आप्पासाहेब कीर्तने, नारायण कालकुंद्री, कांतेश चलवेटकर, मोहन बेनके, रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मणराव होनगेकर, विठ्ठल पाटील, सहदेव परीट, अॅड. एम. जी. पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.