मेंदू-मणक्याच्या आघातांच्या बाबतीत जागरुकता आवश्यक
आरोग्य आज सर्वांसाठीच जागरुक होण्याचा विषय झाला आहे. कोणत्याही प्रकारचे आघात झाल्यास आपण नेमके काय करायचे? हे जाणून घेण्यासाठी जागतिक ट्रॉमा दिन 17 ऑक्टोबरला साजरा केला जातो. प्रामुख्याने मेंदू आणि मणक्याच्या आघातांच्या बाबतीत लोकांना शिक्षित करणे आवश्यक आहे. मेंदूला अनेक कारणांमुळे आघात होऊ शकतो. जसे की पडणे, कार अपघात, खेळताना झालेली इजा, एखाद्या हल्ल्यामुळे झालेला आघात वगैरे. परिणामी चक्कर येणे, डोके दुखणे, सतत विमनस्क अवस्थेत राहणे, स्मरणशक्ती कमी होणे अशी लक्षणे दिसू लागतात. मेंदूच्या आघाताचे निदान करणे आव्हानात्मक असू शकते. त्यामध्ये उपचार, औषधोपचार, शस्त्रक्रिया आणि पुनर्वसन यांचा समावेश असतो. जर रुग्णाच्या शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यास शस्त्रक्रिया करणे भाग पडते. दरवर्षी लाखो लोक मेंदूविकाराने त्रस्त होतात आणि त्यांच्या जीवनाच्या दैनंदिन व्यवहारांवर मर्यादा येतात. कदाचित त्यांना दीर्घकालीन अपंगत्व येऊ शकते. मेंदूवरील उपचाराचा आर्थिक भार हा मोठा असतो. यासाठी हेल्मेट घालणे, सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक असते.
मेंदू आणि मणक्याचे आघात हे गंभीर स्वरुपाचे असून जगभरातील 69 दशलक्ष लोक मेंदूविकाराने त्रस्त आहेत. अर्थात या विकारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी असले तरी अपंगत्वाचे प्रमाण आणि दीर्घकालीन परिणामांचे प्रमाण अधिक आहे. मेंदूविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णाचा सांभाळ करणे हे त्यांच्या कुटुंबीयांच्या समोर मोठे आव्हान असते. मणक्याच्या आघातामुळे 500,000 लोक त्रस्त आहेत. त्यांच्यावर मग शारीरिक, भावनिक व आर्थिक ताण येतो. मणक्याच्या आजारासाठीसुद्धा महागडी वैद्यकीय सेवा, विशेष उपकरणे आणि पुनर्वसन सेवा आवश्यक आहे. मणक्याचे दुखणे रोखण्यासाठी सुरक्षेविषयीची जागरुकता वाढविणे, रहदारी नियमांचे पालन करणे व पायाभूत सुविधा सुधारणे आवश्यक आहे. जेणेकरून पडणे आणि वाहतूक अपघात टाळता येईल. शेवटी कोणत्याही स्वरुपाचा आघात ही जागतिक आरोग्य समस्या आहे. मेंदू आणि मणक्याचे आघात अधिक आहेत. त्याचा व्यक्ती आणि कुटुंबावर परिणाम होतो. जागतिक ट्रॉमा दिनानिमित्त याबद्दल माहिती घेऊन पूर्वदक्षता घेणे आवश्यक आहे.
- डॉ. रविराज घोरपडे, एमसीएच
(मेंदू आणि मणक्याचे सर्जन,लेक व्ह्यू हॉस्पिटल)