फॅटी लिव्हरबाबत जागरुकता आवश्यक
दरवर्षी 19 एप्रिल रोजी जागतिक यकृत दिन साजरा केला जातो. युरोपियन असोसिएशन फॉर दी स्टडी ऑफ दी लिव्हरने (इएएसएल) 2010 पासून हा दिवस साजरा करायला सुरुवात केली. यकृताशी संबंधित आजारांबाबत जनजागृती करणे हा त्यामागचा उद्देश आहे. यकृत (लिव्हर) हा मानवी शरीरातील अत्यंत महत्त्वाचा व संवेदनशील अवयव आहे. यकृत चांगले असेल तर शरीरातील सर्व क्रिया सुरळीत चालतात. पण, त्यात काही बिघाड झाला तर शरीराच्या तंदुरुस्तीचे समीकरणच बिघडून जाते. गेल्या काही दशकांपासून बदलत्या जीवनशैलीमुळे यकृताच्या विकारांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यात फॅटी लिव्हर हा विकार सध्या अधिकत्वाने आढळून येत आहे. यंदाच्या जागतिक यकृत दिनाची थीमही फॅटी लिव्हरच आहे. यावरूनच फॅटी लिव्हरचे गांभीर्य लक्षात येते. यकृताचा विकार म्हटले की मद्याची आठवण आपसूकच होते. त्यात तथ्यही आहे. कारण यकृताच्या बहुतांश विकारांचे सामान्य कारण आजदेखील मद्यच आहे. त्यानंतर हिपेटायटिस बी व सी या विषाणू संसर्गाचा क्रम लागतो. पण, गेल्या दोन दशकांत फॅटी लिव्हर हे यकृत अकार्यक्षम बनण्याचे प्रमुख कारण बनत चालले आहे.
अतिरिक्त चरबी निर्मिती
यकृतात अतिरिक्त चरबी निर्माण होण्याची प्रक्रिया आधी घातक समजली जात नव्हती. पण, आता अतिरिक्त चरबी निर्मिती झाल्यास यकृताच्या कार्यावर परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे. यकृतात चरबी साठण्याचे प्रमाण व वेळ वाढत गेल्यास या फॅटी लिव्हर आजाराचे रुपांतर आधी स्टीआटोसिसमध्ये व नंतर हिपेटायटिस व सायरॉसिसमध्ये होऊन शेवटी यकृत निकामी होणे व यकृताच्या कर्करोगात होऊ शकते.
फॅटी लिव्हरची कारणे
फॅटी लिव्हर विकार का वाढत आहे? तर त्यामागे अनेक कारणे आहेत. टाइप 2 मधुमेह व लठ्ठपणाच्या प्रमाणात झालेली वाढ, अस्वास्थ्यकारी खान-पान, जंक फूड खाण्याचे वाढलेले प्रमाण, बैठी जीवनशैली, वर्क फ्रॉम होम आदी कारणांमुळे शरीरासह यकृतात चरबी साठण्याचे प्रमाण वाढत असून फॅटी लिव्हरसारखे विकार बळावत आहेत.
ग्रामीण भागातही प्रसार
फॅटी लिव्हर विकाराचा प्रसार शहरी लोकांमध्ये असल्याचे मानले जात होते. मात्र, अलीकडच्या काळात झालेल्या वेगवेगळ्या अभ्यासातील निष्कर्षांनुसार हा विकार ग्रामीण लोकांमध्येही बळावत असल्याचे आढळून आले आहे. जगात सध्या 10 ते 30 टक्के लोकांना फॅटी लिव्हरची लागण झालेली आहे. केएलईचे योगदान केएलई रुग्णालयातील डॉ. संतोष हजारे यांच्या नेतृत्वाखालील गॅस्ट्रोएन्टरोलॉजी विभाग सध्या फॅटी लिव्हरच्या निदानासाठी नियमित तपासणी शिबिरे आयोजित करत आहे. या शिबिरात फॅटी लिव्हरग्रस्त रुग्णांच्या विकाराचा टप्पाही समजून घेणे शक्य झाले आहे. गेल्या पाच वर्षात सहा हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यामधील 34 टक्के फॅटी लिव्हरग्रस्त असल्याचे आढळून आले आहेत. विशेष म्हणजे त्यातील 20 टक्के रुग्णांच्या यकृतात बिघाड झाल्याचे स्पष्ट झाले आहे
फायब्रोस्कॅन मशीन
विकाराचे निदान आणि टप्पा निश्चितसाठी फायब्रोस्कॅन मशीन मैलाचा दगड ठरली आहे. फायब्रो -स्कॅन ही एक घातक नसलेली वेदनाविरहीत निदान पद्धत असून त्यामुळे यकृतातील चरबी व फायब्रोसिसचे काही क्षणातच अचूक मूल्यांकन करता येते. ही मशीन गेली पाच वर्षे कार्यरत असून वरील डाटा मिळविणे शक्य झाले आहे.
वेळीच तपासणी आवश्यक
लक्षणे नसलेल्या फॅटी लिव्हर रुग्णांना शोधण्यासह त्यांचा विकार रोखण्यात आतापर्यंत आयोजित केलेल्या शिबिरांचा लाभ झाला आहे. फॅटी लिव्हरचे लवकर निदान होण्यासह प्रसार रोखण्यासाठी स्थूल रुग्ण, मधुमेही आणि यकृतांच्या विकारांचा कौटुंबिक इतिहास असलेल्यांची तपासणी होणे आवश्यक ठरते. एकदा का यकृत विकार हाताबाहेर गेला की ती रोखता न येणारी हानी ठरते. अन् यकृत निकामी झाल्यास आयुष्यभर उपचार किंवा यकृत प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसतो.
फॅटी लिव्हरला कसे रोखायचे?
निरोगी जीवनशैली हाच फॅटी लिव्हरला रोखण्याचा किंवा त्रास कमी करण्याचा सोपा उपाय आहे. त्यात मद्यपान न करणे, चरबीयुक्त पदार्थांचे सेवन न करणे, साखर व मिठाचे प्रमाण कमी करणे, आहारात कडधान्ये, फळे व भाज्या सेवन करणे तसेच प्रतिसप्ताह किमान 150 मिनिटे चालणे आदींचा समावेश होतो. हे सोपे उपाय अंमलात आणल्यास फॅटी लिव्हरला दूर ठेवणे शक्य होते. फॅटी लिव्हर वा फायब्रोस्कॅनसंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास गॅस्ट्रोएन्टरोलॉजी विभाग, केएलई रुग्णालय (मो. 7738699744) येथे संपर्क साधावा. केएलई रुग्णालयात प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी गरीब रुग्णांचे मोफत फायब्रोस्कॅन केले जाते. आतापर्यंत 2,500 रुग्णांचे मोफत स्कॅन करण्यात आले आहे. फॅटी लिव्हर विकारामध्ये एक समस्या अशी आहे की, सुरुवातीला बहुतांश रुग्णांमध्ये कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. अन् ज्यावेळी निदान होते त्यावेळी हा विकार यकृत खराब होण्यापर्यंत पोचलेला असतो. विकाराचे लवकर निदान करणे डॉक्टरांसाठी एक आव्हानच असते. त्यामुळेच फायब्रोस्कॅन मशीनच्या साहाय्याने होणारी तपासणी शिबिरे उपयुक्त ठरतात.
-संतोष हजारे,लिव्हर स्पेशालिस्ट, केएलई रुग्णालय