मानसिक आरोग्याबाबत जागरुकता हवी
10 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्याबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हे या दिनाचे प्रयोजन आहे. शारीरिक आरोग्याबाबत आपण नेहमीच दक्ष असतो, परंतु ही दक्षता आपण मानसिक आरोग्याबाबत दाखवत नाही. शारीरिक आरोग्याचे महत्त्व आपण जाणतो, मात्र मानसिक आरोग्याबाबत आपण अनभिज्ञ असतो, ही वस्तुस्थिती आहे. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. शारीरिक व मानसिक आरोग्याचा एकत्रित विचार करणे ही काळाची गरज आहे.
शारीरिक आजाराबाबत रुग्णाला इतरांकडून सहानभुती मिळते तशी सहानभुती मनोविकारग्रस्त असलेल्या रुग्णाला मिळत नाही. बऱ्याचवेळा मनोविकार हा काल्पनिक आजार आहे असेच मनोरुग्णाच्या नातेवाईकांनाच नव्हे तर इतरांनाही वाटत असते. त्यामुळे मनोरुग्णांवर उपचार करण्याची तत्परता त्यांचे नातेवाईक दाखवत नाहीत, किंवा संबंधित इतरही दाखवत नाहीत. तसेच मनोविकार लपवण्याकडेच मनोरुग्णांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा कल असतो. त्यामुळे मनोविकाराची तीव्रता अधिकच वाढत जाते.
जगभरात सुमारे 50 कोटी लोक मनोविकाराने ग्रस्त असल्याचे संशोधनात आढळून आले आहे. त्यापैकी 20 कोटी लोकं नैराश्यरोग या मनोविकाराने ग्रस्त आहेत. भारतातही मनोविकाराचे प्रमाण खूपच वाढत चालले आहे. बंगळूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्युरो सायन्सेस (निम्हास) या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात देशातील प्रत्येकी 11 निरोगी व्यक्तीमागे एक व्यक्ती मनोविकाराने ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. मनोविकाराचे आपल्या देशातील प्रमाण नऊ टक्के आहे. भारतातील मनोरुग्णालयात दीड लाख मनोरुग्ण भरती आहेत, तर मनोरुग्णालयाच्या बाहेर 13 कोटी मनोरुग्ण मुक्तपणे संचार करत आहेत. पाश्चिमात्य राष्ट्राच्या तुलनेत भारतात मनोविकार तज्ञांची संख्या आणि मनोरुग्णालयांची संख्या खूपच अपुरी आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 2030 पर्यंत हृदयरोगानंतर नैराश्य किंवा डीप्रेशन मनोविकार हा दुसऱ्या क्रमांकावर असेल. वाढत्या ताणतणावामुळेच नैराश्यासारखे मनोविकार आगामी काळात वाढत जाणार आहेत. पूर्वी प्रामुख्याने आर्थिक कमतरता किंवा दारिद्र्यामुळे या विकाराला बळी पडण्याचे प्रमाण अधिक होते. बदलत्या काळानुसार अशा मनोविकारांची कारणेही बदलली आहेत. डीप्रेशन सारख्या मनोविकारांवर त्वरित उपचार होणे आवश्यक असते, अन्यथा आजाराची तीव्रता वाढत जाते. बऱ्याचवेळा मनोविकारांमध्ये अनुवंशिकता हा घटकही महत्त्वाचा ठरतो. आई-वडिलांपैकी एखाद्यास मनोविकार असेल तर त्यांच्या मुलांनाही मनोविकार होण्याची शक्यता असते. प्रत्येक क्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा, बेकारी, अपयश, विभक्त कुटुंब व्यवस्था, आर्थिक असुरक्षितता अशा अनेक घटकांमुळे मनोविकार होण्याची शक्यता वाढते. काही वेळा व्यक्तीमत्त्व दोष मनोविकाराला कारणीभूत ठरतात.
मनोविकारावर प्रभावी उपचारपद्धती उपलब्ध असूनही रुग्णांमध्ये मानसोपचाराबाबत अनभिज्ञता आढळून येते. औषधोपचार, मानसोपचार, समुपदेशन, वर्तन उपचार, संमोहन उपचार आदी उपचार पद्धती मनोरुग्णासाठी उपलब्ध आहेत. बहुतांशी मनोविकार योग्यवेळी नियमितपणे उपचार घेतल्यास पूर्णपणे बरे होऊ शकतात. मात्र उपचारांबाबतच्या अज्ञानामुळे रुग्ण मनोविकारावर उपचार घेण्यासाठी तत्परता दाखवत नाहीत. त्यामुळे मनोविकार व मानसोपचार लोकशिक्षणाची आवश्यकता आहे.
आपल्या आसपास बऱ्याचवेळा मनोरुग्ण वावरत असतात. रस्त्यावर विवस्त्र फिरणारे, चित्र-विचित्र हावभाव करणारे, दगड मारणारी व्यक्ती म्हणजेच वेडा हा गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. भीती वाटणे, अगदी निरूत्साही राहणे, कामात एकाग्रता न होणे, मनात सतत नकारार्थी विचार येणे, सतत उदास वाटणे, संशय वाटणे, आत्महत्येचे विचार येणे आदी लक्षणे ही एखाद्या मनोविकाराची असू शकतात. मनोविकार उपचार होण्यास संकोच बाळगणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. मनोविकाराची सुरूवातीची लक्षणे दिसताच त्वरित उपचार घ्यायला हवेत. त्यामुळे आपल्यात मानसिक अस्वास्थाची काही लक्षणे आढळली तर आपण त्वरित मनोविकार तज्ञांचा किंवा मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेणे निश्चितच शहाणपणाचे ठरू शकते.
-डॉ. चंद्रकांत शं. कुलकर्णी