म. ए. समितीच्या महामोर्चाबाबत उचगाव, तुरमुरी येथे जागृती
वार्ताहर/उचगाव
कर्नाटक सरकारकडून सुरू असलेल्या कन्नड सक्तीविरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. 11 ऑगस्ट रोजी महामोर्चा काढला जाणार आहे. त्या संदर्भात उचगाव, तुरमुरी येथील नागरिकांनी बैठक घेऊन गावात जागृती करण्यात आली. गावातील प्रमुख मार्गावरील आणि गल्लीतील नागरिकांना तसेच युवकांना मोर्चा संदर्भात माहिती देऊन मोर्चा यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच गावातील महिला मंडळातील सभासदांनादेखील मराठी भाषेचे महत्त्व सांगून मोठ्या संख्येने उपस्थित होण्यासाठी महिलांमध्ये जागृती करावी, असे सांगण्यात आले.
यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, युवा नेते आर. एम. चौगुले तसेच समितीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उचगाव येथील मध्यवर्ती गणेश विठ्ठल-रखुमाई मंदिरामध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी उचगावमधील लक्ष्मण होनगेकर, अंकुश पाटील, किसन लाळगे, हनमंत नवार, शरद चौगुले यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर तुरमुरी येथे गणेश मंदिरामध्ये बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी सुरेश राजूकर, महेंद्र जाधव यासह अनेक मान्यवर व गावातील म. ए. समितीनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.