हिंडलगा कारागृहात तंबाखू-मद्यपान विरोधात जागृती
बेळगाव : हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी तंबाखू व मद्यपान विरोधात जागृती कार्यक्रम मंगळवार दि. 7 रोजी झाला. अध्यक्षस्थानी कारागृह अधीक्षक व्ही. कृष्णमूर्ती व प्रमुख पाहुणे म्हणून मनोविकार तज्ञ डॉ. सरस्वती व मानसशास्त्रज्ञ आशा हिरेमठ उपस्थित होत्या. प्रारंभी, निवृत्त जिल्हा न्यायाधीश डी. आर. रेणके यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यांनी आपल्या भाषणात व्यसनांमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाबाबत माहिती दिली. तंबाखू व मद्यपान सेवनामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून व्यसनापासून दूर राहणे हेच आरोग्याला हितकारक आहे.
कैद्यांनी सुटकेनंतर चांगले कार्य करीत उत्तम नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले. मनोविकार तज्ञ डॉ. सरस्वती म्हणाल्या की, तंबाखू व मद्यपान सेवनामुळे आरोग्य धोक्यात येते. या व्यसनांमुळे अनेकजणांचे बळी गेले आहेत. ध्यानधारणा, योग, प्राणायाम नित्यनियमाने करून आरोग्य सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. त्यानंतर कारागृह अधीक्षक कृष्णमूर्ती यांनीही कैद्यांना मार्गदर्शन केले. मद्यपानासारख्या व्यसनामुळे आरोग्यावर दुष्परिणाम तरी होतोच शिवाय व्यक्ती वाईट कामाकडे वळते. समाजात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून यामुळे समाजात अस्थैर्य निर्माण होत आहे. कैद्यांनी निर्व्यसनी राहून सुटकेनंतर समाजातील उत्तम नागरिक बनावे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाला कारागृह अधिकारी बी. वाय. बजंत्री, गुरुसिद्ध मठ, प्रा. एस. एस. यादगुडे आदी उपस्थित होते.