बाल कर्करुग्णांबाबत जागृती आवश्यक
जागतिक आरोग्य संघटनेकडून 15 फेब्रुवारी ‘बाल कर्करोग दिन’ घोषित : 19 वर्षांखालील 3000 मुलांमध्ये दरवर्षी रोगाची लक्षणे
कर्करोग या शब्दाची भीती कमी करत कर्करोग बरा होऊ शकतो, हा समज रुजविणे आवश्यक आहे. आजसुद्धा मोठ्यांनाही कर्करोग हे वास्तव सहजी स्वीकारता येत नाही. तेथे लहान मुलांच्या कर्करोगाबाबत आपण विचारही करू शकत नाही. परंतु 0 ते 19 वर्षांच्या 3000 मुलांमध्ये दरवर्षी कर्करोग आढळून येतो. याबाबत जागृती करणे आवश्यक असून याच हेतूने जागतिक आरोग्य संघटनेने दरवर्षी 15 फेब्रुवारी हा दिवस ‘बाल कर्करोग दिन’ म्हणून आचरण्यात आणण्याचे जाहीर केले. यंदाच्या या कर्करोग दिनाचे ब्रिदवाक्य आहे, ‘सर्व जण एकत्रित येऊ व हा रोग कमी करण्याची आशा पल्लवीत करू.’ याचाच अर्थ सर्वांनी एकत्रित येणे, संघटनात्मक कार्य करणे व बाल कर्करोगाविरुद्ध झगडणे होय. सर्वसाधारण गरीब व मध्यम परिस्थितीतील साधारण 80 टक्के मुलांना या विकाराने ग्रासले आहे. याचा त्रास केवळ मुलांनाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला होतो. शिवाय त्यांना मानसिक, आर्थिक व सामाजिक समस्यांनाही सामोरे जावे लागते. सुदैवाने आधुनिक संशोधनामुळे या रोगातून बरे होण्याचे प्रमाण जवळजवळ 80 टक्क्यांनी वाढले आहे. तथापि, गरीब व मध्यम कुटुंबातील मुलांना कमी सुविधा मिळतात. कारण एक तर ही कुटुंबे खेड्यात किंवा दुर्गम भागात राहतात. त्यामुळे त्यांच्यासाठी अलीकडच्या काळात बाल कर्करोग चिकित्सा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ज्यामुळे लवकर निदान होणे, योग्यवेळी उपचार मिळणे शक्य होते.
बेळगावच्या केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये 2017 पासून बाल कर्करोग निदान केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या साडेसहा वर्षांमध्ये 450 मुलांना त्याचा लाभ झाला आहे. उत्तर कर्नाटकामध्ये केएलईतील हे एकमेव चिकित्सा केंद्र आहे. सरकार आणि अन्य खासगी स्वयंसेवी संस्थांकडून अर्थसाहाय्य उपलब्ध होत असल्याने तसेच काही आरोग्य योजना लागू केल्याने बाल कर्करुग्णांना त्यांच्या उपचाराचा लाभ होत आहे. सर्वसाधारण मुलांमध्ये कर्करोग हा रक्तदोषामुळे लिफग्रंथी, मेंदू, शिरा, मुत्रपिंड, हाडांचे स्नायु याचा कर्करोग आढळतो. जितक्या लवकर निदान होईल तितक्या लवकर कर्करोग बरा होतो. मात्र, त्यासाठी मुलांमध्ये आढळलेल्या लक्षणांवर पालकांनी लक्ष ठेवायला हवे. साधारणत: नकळत ताप येणे व खूप उशीरा तो लक्षात येणे, शरीराच्या कोणत्याही अवयवाला सूज येणे, अशक्य दिसणे, वजन कमी होणे, सतत हाडे दुखणे, उलट्या होणे किंवा डोके दुखणे, खरचटून रक्त येणे, दृष्टी कमी होणे अशी लक्षणे आढळतात.
भारतात अनेक लहान मुलांमध्ये आर्थिक अडचणींमुळे उपचार मिळू शकत नाहीत व त्यांच्या निदानालाही उशीर होतो. नियमित निदान करून चिकित्सा करणारे फारच कमी तज्ञ उपलब्ध आहेत. बाल कर्करोग रुग्णांसाठी चिकित्सा केंद्रे वाढविणे, तज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देणे, मुलांचे व पालकांचे समुपदेशन करणे असे उपचार या दिनाच्या निमित्ताने राबविणे आवश्यक आहे. समाजामध्येही बाल कर्करोगाबद्दल जागृती करणे आवश्यक आहे. म्हणूनच सुसज्ज हॉस्पिटलशी, प्राथमिक आरोग्य केंद्रांशी संपर्क करणे आवश्यक आहे. सामाजिक व आर्थिक साहाय्य देऊन समाज आपली जबाबदारी पार पाडू शकतो. केएलई हॉस्पिटलमध्ये बाल कर्करुग्ण हा स्वतंत्र विभाग आहे. तेथे पालक आपल्या कर्करोगग्रस्त मुलांना घेऊन जाऊन माहिती घेऊ शकतात व उपचारही करून घेऊ शकतात.
-डॉ. अभिलाषा एम. बाल कर्करोगतज्ञ-केएलई हॉस्पिटल-प्राध्यापक जेएनएमसी शब्दांकन : डॉ. अंजली जोशी