जागरूक नागरिकांनी भ्रष्टाचार विरोधात पुढे यावे; 'लाचलुचपत'चे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे यांचे आवाहन
सांगरुळ / वार्ताहर
सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचारी प्रवृत्ती फोफावत आहे .यामुळे समाजाची पिळवणूक होत आहे . अशा भ्रष्ट प्रवृत्तीला आळा घालून भ्रष्टाचार मुळापासून उखडून काढण्यासाठी समाजातील जागरूक नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे. सजग नागरिक म्हणून प्रत्येकाने भ्रष्टाचाराच्या विरोधात निर्भीडपणे पुढे यावे. असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूरचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे यांनी केले.
भ्रष्टाचारा विरोधात जागृती व्हावी या उद्देशाने केंद्रीय दक्षता आयोग नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार राज्यात दिनांक दिनांक ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत 'भ्रष्टाचारला नाही म्हणा राष्ट्रासाठी वचनबद्ध व्हा' असा जनजागृती सप्ताह आयोजित केला आहे .या पार्श्वभूमीवर सांगरुळ येथील महादेव मंदिर मध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच शितल बदाम खाडे होत्या .
यावेळी बोलताना सरदार नाळे म्हणाले की देशाच्या आर्थिक ,राजकीय आणि सामाजिक प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा प्रमुख अडथळा आहे . हा अडथळा दूर करून समाजाची प्रगती व्हायची असेल तर प्रत्येक नागरिकांनी सहकार्याची भावना ठेवली पाहिजे . भ्रष्टाचार निर्मूलनासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी काम करण्याची नितांत गरज आहे. 'भ्रष्टाचार' हा समाजातील सजग नागरिकांनी पुढे येऊन थांबवला जाऊ शकतो. यासाठी नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे म्हणाले भ्रष्टाचार निर्मूलन मोहिमेला सहकार्य करण्यासाठी सांगरूळ परिसरातील नागरिकांनी सरकारी कार्यालयात लाच न देण्याची शपथ घेऊया, व असे कोणी लाच मागितल्यास लाचलुचपत कार्यालयास कळवूया. यावेळी उपसरपंच उज्वला लोंढे ,दिगंबर तावडे, बाळासो खाडे ,सचिन लोंढे, मुरलीधर कासोटे,एन. जी.खाडे दत्तात्रय सुतार यांच्यासह परिसरातील नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते.