शिस्त पाळणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार
यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांचा उपक्रम
बेळगाव : ग्रामीण भागातील गणेशोत्सवाला शिस्त लावण्यासाठी यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी शिस्त पाळणाऱ्या गणेश मंडळांना पुरस्कार देण्याचे जाहीर केले होते. गणेशोत्सवानंतर 72 गावांतील दोन मंडळांना प्रत्येकी दहा हजार रुपये रोख व ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या 72 गावांतील गणेश मंडळांना शिस्त लावण्यासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. श्रींचे आगमन व श्री विसर्जन मिरवणुकीत डीजेला फाटा द्यावा, वेळेत विसर्जन करावे, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यसनापासून दूर रहावे, उत्सवाच्या काळात 24 तास स्वयंसेवक मंडळात तैनात करावेत व श्रींचे उत्तम अलंकार करावे, या अटी घालण्यात आल्या होत्या. या सर्व पाच अटी पूर्ण करणाऱ्या हत्तरगी येथील बाल गजानन युवक मंडळ व कुमचेनमर्डी येथील जी. जी. बॉईज गजानन उत्सव मंडळांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
प्रत्येकी दहा हजार रुपये रोख व ट्रॉफी देऊन रविवारी गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यमकनमर्डी पोलीस स्थानकात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांचा सत्कार करण्यात आला. गणेशोत्सवाच्या काळात पुरस्कारासाठी प्रत्येकी 36 गावांची विभागणी करून कार्यकर्त्यांमध्ये जागृती करण्यात आली होती. पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर द्यावा, कार्यकर्ते व्यसनापासून दूर रहावेत, भक्तिभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात उत्सव साजरा करावा यासाठी जावेद मुशापुरी यांनी त्यांना पुरस्कार देण्याचे जाहीर केले होते. पोलीस, गावातील प्रमुख व या परिसरातील पत्रकार यांच्यावर उत्तम मंडळ निवडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. रविवारी पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना पुरस्कार देण्यात आला. गणेशोत्सवाच्या काळात जातीय सलोखा राखलेल्या व उत्सवात सहभागी झालेल्या यमकनमर्डी व पाच्छापूर परिसरातील मुस्लीम नेते-कार्यकर्त्यांचाही सत्कार करण्यात आला. यापूर्वी शहापूर, एपीएमसी पोलीस स्थानकात कार्यरत असतानाही जावेद मुशापुरी यांनी असे उपक्रम राबविले होते.