राष्ट्रीय आदर्श प्राचार्य पुरस्कार वेंगुर्लेच्या डॉ. विलास देऊलकर यांना प्रदान
वेंगुर्ले(वार्ताहर)-
वेंगुर्ले शहरातील बँ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विलास देऊलकर यांना भारत सरकार पुरस्कृत संस्था नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन व इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी, बेळगावी यांच्याकडून दिल्ली, गुजरात, गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यातून गुणवत्तेवर आधारीत निवडक प्राचार्यांना देण्यात येणारा राष्ट्रीय आदर्श प्राचार्य गौरव पुरस्कार वेंगुर्लेतील बँ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देऊलकर यांना देण्यात आला असून या पुरस्काराचे वितरण बेळगांव येथील कार्यक्रमांत मलेशियाच्या उद्योजक महिला स्मिता इंग्रोळे व कोल्हापूरचे महापौर राजू शिंगाडे यांच्या हस्ते व पाचही प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आला. वेंगुर्ले शहरातील बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विलास देऊलकर हे १२ डिसेंबर २०१४ ते ११ जून २०२३ पर्यंत बॅ. खर्डेकर महाविद्यालयात प्राचार्य पदी कार्यरत होते. या काळात शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापुरचे सचिव प्रा. जयकुमार देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात राबविलेले विविध विद्यार्थीभिमुख उपक्रम, महाविद्यालयाच्या वाढ, विकास आदी कामे प्राचार्य असताना दिलेले योगदान, महाविदयालयाचा शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी केलेले प्रयत्न, प्राचार्य म्हणून त्यांचे प्रशासकीय कौशल्य यांचा विचार करून त्यांना हा राष्ट्रीय आदर्श प्राचार्य गौरव पुरस्कार देण्यात आला. महाविद्यालयाची गुणवत्ता ठरविण्यासाठी नॅक कमिटी बेंगलोर ही संस्था मूल्यमापन करून महाविद्यालयाचा दर्जा ठरविते. प्राचार्य डॉ. देऊलकर यांच्या प्राचार्य कार्यकाळात बँ. खर्डेकर महाविदयालयाची दोन वेळा नॅक कमिटी, बेंगलोर यांनी मूल्यांकन केले. मार्च २०१४ मध्ये झालेल्या सेकंड सायकल नॅक मूल्यांकनामध्ये महाविद्यालयाला 'बी' रोड नामांकन मिळाले, तर जानेवारी २०२३ मध्ये झालेल्या थर्ड सायकल नॅक मूल्यांकनामध्ये महाविद्यालयाला 'ए' ग्रेड प्राप्त होऊन महाविद्यालयाला मोठे यश मिळाले.
डॉ. देऊलकर यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत अनेक शोध निबंध सिध्द झालेले आहेत. मुंबई विदयापीठ एन.एस.एस. जिल्हा समन्वयक असताना त्यांनी जिल्हयात विविध उपक्रम राबविले आहेत, तसेच त्यांनी मुंबई विद्यापीठ एन. एस. एस. सल्लागार समिती सदस्य म्हणून काम पाहीलेले आहे. मुंबई विद्यापीठ इतिहास विषयाचे विषय तज्ञ, जिल्हा आपतकालीन व्यवस्थापन, रेड रिबन क्लब, सिंधुदुर्ग जिल्हा गॅझेट समिती अशा विविध समित्यांवर त्यांनी काम केलेले आहे. यापूर्वी त्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचा बेस्ट प्रोग्राम ऑफिसर म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. तसेच शिक्षक सेनेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. त्यांना हा राष्ट्रीय आदर्श प्राचार्य गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापुरचे सचिव जयकुमार देसाई, पेटून कौंसिल मेंबर दौलतराव देसाई, चेअरमन सौ. मंजिरी देसाई-मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.