For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अभिनव बिंद्रा यांना प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार

06:56 AM Jul 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
अभिनव बिंद्रा यांना प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भारतीय दिग्गज नेमबाज अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिकमधील उत्कृष्ट सेवेसाठी ‘ऑलिम्पिक ऑर्डर’ पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी याबाबतची घोषणा केली. 10 ऑगस्ट रोजी पॅरिसमध्ये होणाऱ्या सोहळ्यात बिंद्रा यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

आयओसी अध्यक्षांनी 20 जुलै रोजी बिंद्रा यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे की, ऑलिम्पिकमधील तुमच्या प्रशंसनीय सेवेसाठी तुम्हाला ‘ऑलिम्पिक ऑर्डर’ देण्याचा निर्णय घेतला आहे. बाक यांनी अभिनव यांना पुरस्कार सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे. बिंद्रा यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल भारताचे क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Advertisement

41 वर्षीय अभिनव बिंद्राने 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारे ते भारताचे पहिले खेळाडू आहेत. अभिनव यांच्यानंतर 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राने वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले आहे. बिंद्रा 2010 ते 2020 पर्यंत आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट्स फेडरेशनच्या अॅथलिट समितीचे सदस्य होते, तर 2014 पासून ते अध्यक्ष आहेत.

ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार मिळवणारे दुसरे भारतीय

ऑलिम्पिक ऑर्डर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा सर्वोच्च पुरस्कार आहे, जो ऑलिम्पिकमधील विशेष योगदानासाठी दिला जातो. सुवर्ण, रौप्य व कांस्य अशा तीन प्रकारात हा पुरस्कार दिला जातो. आयओसीतर्फे प्रथम हा पुरस्कार 1975 साली दिला गेला. तेव्हापासून आतापर्यंत 116 सेलिब्रिटींना गोल्ड ऑलिम्पिक ऑर्डर मिळाली आहे. यामध्ये एका भारतीयाचा समावेश आहे. अभिनव बिंद्रा यांच्यापूर्वी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना हा पुरस्कार मिळाला होता. 1983 साली मुंबईत झालेल्या पुरस्कार सोहळ्यात इंदिरा गांधींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

ऑलिम्पिकमधील अतुलनीय योगदानाबद्दल अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन. आपल्या अनमोल कामगिरीचा संपूर्ण देशवासियांना अभिमान आहे. आपला हा पुरस्कार पुढील पिढ्यासाठी प्रेरणादायी ठरेल, अशी आशा आहे.

केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया.

Advertisement
Tags :

.