जिल्हा पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर
तरुण भारतचे मुख्य उपसंपादक अवधूत पोईपकर,गणपत डांगी,दत्तप्रसाद पेडणेकर यांची पुरस्कारासाठी निवड
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघामार्फत ६ जानेवारी रोजी होणाऱ्या पत्रकार दिनानिमित्त देण्यात येणारे ९ उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत . नऊ जणांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये सावंतवाडी मधून तरुण भारतचे मुख्य उपसंपादक अवधूत पोईपकर ,दोडामार्गचे प्रतिनिधी गणपत डांगी यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार आणि मसुरे प्रतिनिधी दत्तप्रसाद पेडणेकर यांना ग्रामीण पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच कणकवली मधून जेष्ठ पत्रकार पुरस्कार चंद्रशेखर तांबट यांना, वैभववाडी मधून युवा पत्रकार पुरस्कार श्रीधर साळूंखे यांना तसेच उर्वरित उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सिंधुदुर्गनगरी मधून नंदकुमार आयरे,वेगुर्ल्या मधून प्रथमेश गुरव,कुडाळ मधून प्रमोद म्हाडगूत , देवगड मधून दयानंद मांगले , यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
पुरस्कार निवडीसाठी सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार भावनामध्ये जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यानंतर येथील पत्रकार कक्षात पत्रकार परिषद घेऊन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी पुरस्कार जाहीर केले. यावेळी सचिव देवयानी वरसकर,उपाध्यक्ष बाळ खडपकर,सहसचिव महेश रावराणे, सदस्य राजन नाईक, महेश सरनाईक,संतोष राऊळ उपस्थित होते. तालुका संघ आणि मुख्यालय पत्रकार संघ यांच्याकडून पुरस्कारासाठी दोन पत्रकाराची शिफारस करण्यात आली होती. त्यामधून प्रत्येकी एक याप्रमाणे नऊ जणांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ६ जानेवारीला सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारक व पत्रकार भावना मध्ये पत्रकार दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण केले जाणार आहे. पत्रकार दिन कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लोकमतचे संपादक वसंत भोसले ,रेल्वे पोलीस आयुक्त व सिंधुदुर्गचे तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ रवींद्र शिसवे उपस्थित राहणार आहेत तसेच् उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दिपक केसरकर,पालकमंत्री रवींद्र चव्हाण,आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती उमेश तोरसकर यांनी दिली व जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी ६ जानेवारीला पत्रकार दिन कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे . दरम्यान पत्रकारांच्या गुणवंत व प्रविण्याप्राप्त पाल्याचा सत्कार समारंभ २० फेब्रुवारीला करण्यात येणार आहे. २० फेब्रुवारीला पत्रकार भावनाचा पहिला वर्धापन दिन कार्यक्रम साजरा करण्यात येणार असून त्यावेळी पत्रकारांचे स्नेहसंमेलन व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत या कार्यक्रमात मुलांचा सत्कार केला जाणार आहे अशी माहिती जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी दिली आहे.