For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेशात पुन्हा अवामी लीगची सत्ता

06:14 AM Jan 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
बांगलादेशात पुन्हा अवामी लीगची सत्ता
Advertisement

बांगलादेशास राजकीय हिंसाचार, लष्करी कट आणि हत्याकांड यांचा मोठा इतिहास आहे. या देशाचे वैशिष्ट्या म्हणजे अलीकडच्या काळात शेख हसीना आणि खलीदा झिया या दोन महिलांनी आलटून पालटून या देशाचे नेतृत्व केले आहे. गेल्या रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत अवामी लीग पक्षाने 223 जागांवर विजय मिळवला असून पक्षाच्या नेत्या शेख हसिना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत.

Advertisement

गेल्या 2009 सालापासून मात्र शेख हसीना या बांगलादेशाच्या पंतप्रधानपदी आहेत. गेल्या रविवारी या देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या. अंतिम मतमोजणीत शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने लोकसभेच्या 300 जागांपैकी 223 जागांवर विजय मिळवला. हा विजय अगदी सोपा झाला. कारण बांगलादेशातील मुख्य विरोधी पक्ष खलीदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने सदर निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. या पक्षाने निवडणुकीपूर्वी काळजीवाहू सरकार प्रस्थापित करून मगच निवडणुका घ्याव्यात, असा प्रस्ताव मांडला होता. असे झाले नाही तर निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा या पक्षाने दिला होता. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी हा राजकीय परिभाषेत कट्टरतावादी पक्ष मानला जातो. या पक्षाशी अवामी लीगचा दीर्घकाळ संघर्ष सुरू आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचा मुख्य मित्रपक्ष ‘जमाते इस्लामी’ हा दहशतवादी कारवायांसाठी कुप्रसिद्ध आहे. या पक्षावर दशकभर बंदी घालण्यात आली होती. अलीकडेच ती संपुष्टात आली. या पक्षानेही सरकारवर टीका करीत निवडणुकांवर बहिष्कार टाकला होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी दोन दिवसीय संपही पुकारला होता. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) चा काळजीवाहू सरकारचा प्रस्ताव शेख हसीना यांनी धुडकावला. विशेष म्हणजे 2008 साली पुन्हा निवडून आल्यावर त्यांनी तात्कालिक काळजीवाहू सरकारची तरतूद काढून टाकली होती. कारण 2006 ते 2008 च्या दरम्यानच्या देशातील काळजीवाहू सरकारने लष्करी नियंत्रण देशावर लादले आणि शेख हसीना यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांना अटक केले होते.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीपूर्वी बांगलादेशात विरोधी पक्षांचे सततचे मोर्चे व आंदोलने झाली. त्यात 82 लोकांचा हिंसाचारात बळी गेला व 8000 लोक जखमी झाले. अवामी लीग सरकारने विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांना अटकही केली. या वातावरणामुळे ही निवडणूक पोषक वातावरणात पार पडली नाही. प्रमुख पक्षांनी बहिष्कार टाकला असला तरी सरकारने 27 पक्ष आणि 404 अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीत सहभाग घेतला. त्यामुळे निवडणूक एकतर्फी झाली नसल्याचा दावा केला आहे. परंतु अवामी लीगचेच समर्थक बहुतांशी ‘अपक्ष’ म्हणून लढत होते आणि फुटकळ विरोधी पक्ष रिंगणात असल्याने हसीना यांचा विजय अपरिहार्य होता, असे विश्लेषकांचे मत आहे.

Advertisement

पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होणाऱ्या शेख हसीना यांची गेल्या पंधरा वर्षांची कारकीर्द पाहिल्यास त्यात बऱ्या-वाईट धोरणांचे मिश्रण आढळते. त्या सत्तेवर आल्या तेव्हा बांगलादेश आत्यंतिक गरिबीतून मार्गक्रमण करीत होता. परंतु हसीना यांच्या आर्थिक धोरणांमुळे गरिबीचा दर घसरला. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात मोठी वाढ झाली. बांगलादेशाच्या उत्पादन आणि वस्त्रोद्योग क्षेत्राने त्यांच्या कार्यकाळात मोठी भरारी घेतली. सरासरी आयुष्यमान व महिला रोजगार क्षेत्रात बांगलादेश भारतापेक्षा पुढे गेला. परंतु एकाधिकारशाही आणि विरोधकांना नामोहरम करण्यासाठी लोकशाहीस न शोभणारे मार्ग अवलंबिण्याचा ठपका त्यांच्यावर आहे. नोबेल शांतता पुरस्कार विजेते अर्थतज्ञ व ग्रामीण बँक संकल्पनेचे प्रणेते मुहम्मद युनुस यांना न्यायालयीन ससेमीरा लावून त्रास देण्याची हसीना यांची वृत्ती निषेधार्ह ठरली होती. निवडणुका जिंकल्या म्हणजे अनिर्बंध अधिकार मिळाले ही मानसिकता संसदीय लोकशाहीस साजेशी नाही. सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात परस्पर आदर भावना असावयास हवी. विरोधकांनी सतत रस्त्यावर न उतरता सत्ताधाऱ्यांना संसदीय मार्गांनी विरोध दर्शविण्यातच लोकशाहीचे हीत असते. परंतु शेख हसीना आणि विरोधी पक्ष नेत्या खलीदा झिया ज्यांचे वय आज अनुक्रमे 76 आणि 78 वर्षे आहे त्यांचे परस्परांशी नाते वैरभाव सूडबुद्धीचे आहे. हे जर असेच सुरू राहिले तर राजकीय व सामाजिक वातावरण अस्थिर राहिल्याने देशच धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यातही शेजारच्या पाकिस्तानशी बांगलादेशाचे पारंपरिक वैर आहे. देशातील बेबनावाचा पाकिस्तान केव्हाही फायदा उठवू शकतो. यामुळे सरकारने देशांतर्गत तणाव व भीतीचे वातावरण निवळण्यासाठी विशेष प्रयत्न करावयास हवेत आणि विरोधी पक्षांनी या प्रयत्नांना विधायक प्रतिसाद द्यायला हवा. बांगलादेशातील समाज व्यवस्था बहुविध व गुंतागुंतीची आहे. अशावेळी समाजातून ज्या स्पर्धात्मक मागण्या व आव्हाने उभी ठाकतात त्यांचे निराकरण मुत्सद्दीपणाने व शांततापूर्वक झाले पाहिजे. जेणेकरून सामाजिक एकसंघता टिकून राहिल. या साऱ्या संदर्भासाठींची सर्वाधिक जबाबदारी यानंतर शेख हसीना यांच्यावर राहिल.

बांगलादेश हा तुलनेत छोटा देश असला तरी दक्षिण आशियातील त्याच्या भू-राजकीय स्थानामुळे तो अनेक देशांना महत्त्वाचा वाटतो. अमेरिकेची बांगलादेशात सर्वाधिक गुंतवणूक आहे. गेल्या मे महिन्यात अमेरिकेने जे विशेष व्हिसा धोरण जारी केले त्यात बांगलादेशातील मुक्त व लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेस हानी पोहोचविण्यास जबाबदार होणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना अमेरिकेचा व्हिसा नाकारण्यात आला होता. ताज्या निवडणुकीत अमेरिकेने खलीदा झिया यांच्या बीएनपी पक्षाच्या ‘काळजीवाहू सरकार आणि मुक्त व निष्पक्ष निवडणुका’ या प्रस्तावास पाठिंबा दिला होता. अलीकडच्या काळात बांगलादेश आणि चीनचे संबंध दृढ होताना दिसतात. चीन हा बांगलादेशास मोठ्या प्रमाणात सुरक्षा विषयक सामुग्री व शस्त्रास्त्रांचा पुरवठा करतो. बांगलादेशातील इतर क्षेत्रातही चीनची गुंतवणूक वाढते आहे. स्वाभाविकपणे अमेरिकेस चीनशी बांगलादेशाचे वाढत जाणारे सख्य नापसंत आहे. चीनबरोबर रशियादेखील बांगलादेशाशी आपले संबंध वाढवित आहे ही अमेरिकेची आणखी एक डोकेदुखी आहे. बांगलादेश प्रकरणी आपण एकाकी असल्याचे जाणवल्याने अमेरिकेस शेख हसीना या पंतप्रधानपदी नको आहेत. म्हणूनच विरोधी पक्षांची तळी उचलून प्रस्थापित राजवट हटविण्याच्या दृष्टीने अमेरिकेचे प्रयत्न आहेत.

शेख हसीना यांची राजवट पुर्न:प्रस्थापित होणे ही भारताच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे. बांगलादेशाचे निर्माते असलेल्या शेख मुजीबूर रेहमान यांच्या कन्या शेख हसीना यांना भारताने त्या कठीण काळात केलेल्या सर्वतोपरी मदतीची जाणीव आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात बांगलादेशाचे भारताशी संबंध सलोख्याचे राहिले आहेत. बीएनपी व जमाते इस्लामी यांचा कट्टरतावाद, आएसआय या पाक गुप्तचर संस्थेशी असलेले या दोन्ही पक्षांचे संबंध भारतास ज्ञात आहेत. यामुळे भारत अनेकदा अमेरिकेच्या विरोधात जाऊन हसीना यांच्या अवामी लीगची पाठराखण करीत आला आहे. यावेळीही हसीना यांच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन करून उभय देशांची लोककेंद्रीत भागीदारी अधिक भक्कम करण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे सांगितले. एकंदरीत या विजयानंतर देशांतर्गत आव्हाने त्याचप्रमाणे परराष्ट्रीय धोरणातील वाढती जटीलता हसीना कशा प्रकारे पेलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

-अनिल आजगावकर

Advertisement
Tags :

.