अवध ओझा यांचा आम आदमी पक्षात प्रवेश
अरविंद केजरीवालांनी प्रदान केले सदस्यत्व
वृत्तसंस्था/ नवीदिल्ली
प्रसिद्ध कोचिंग टीचर अवध ओझा यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ओझ यांना औपचारिक स्वरुपात पक्षाचे सदस्यत्व प्रदान केले आहे. यावेळी माजी शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया देखील उपस्थित होते.
अवध ओझा हे दिल्लीत आपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे मानले जात आहे. अवध ओझा हे शिक्षणाच्या क्षेत्रातील प्रख्यात नाव आहे. ओझा यांनी लाखे-कोट्यावधी मुलांना शिक्षण दिले आणि रोजगारक्षम केले आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात ओझा यांचे मोठे योगदान आहे. ओझा यांच्या पक्षप्रवेशामुळे दिल्लीतील शिक्षणाला मजबुती मिळणार असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे.
केजरीवाल आणि सिसोदिया या दोन लोकांनी मला राजकारणात येऊन शिक्षणाचे काम करण्याची संधी दिली आहे. शिक्षण समाज, परिवार आणि राष्ट्राचा आत्मा आहे, जे देश महान झाले, त्याच्या पार्श्वभूमीत कुठे ना कुठे शिक्षणाचे योगदान राहिले आहे. राजकारणात येऊन शिक्षणाचा विकास हाच माझा उद्देश असल्याचे ओझा यांनी म्हटले आहे.