वाढदिवसाचा खर्च टाळत गरजूला दिले हक्काचे छत
गडहिंग्लज येथील संतोष चिकोडेंच्या विधायक कार्याचे कौतुक
जगदीश पाटील
गडहिंग्लज
हल्ली समाजात वाढदिवसाला चौका-चौकात केक कापत डॉल्बी लावत रंगीत, संगीत पार्ट्यांत तरूणाई गुंतल्याचे चित्र असताना गडहिंग्लज येथील शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख संतोष चिकोडे यांनी या सर्व प्रकाराला छेद देत विधायक कार्याचा वसा घेतला. अन् गरजूला हक्काचे छत बांधून देत आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. असा वाढदिवस साजरा केल्याने खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांनी कौतुक करत गडहिंग्लजच्या दौऱ्यावर असताना आमदार सतेज पाटील, शिवसेना नेते विजय देवणे यांच्या उपस्थितीत घरकुलाच्या चाव्या लोहार कुटुंबियांना प्रदान करताच वातावरण भावूक झाले.
गोविंद लोहार आणि संतोष चिकोडे यांची दोस्ती होती. गोविंद लोहार फोटोग्राफर होते. दोन वर्षापूर्वी अचानक त्यांचे निधन झाले. त्यामुळे लोहार कुटुंब उघड्यावर पडले. मयत गोविंद यांची आई लक्ष्मी, पत्नी मधुरा आणि तीन वर्षाची मुलगी गार्गी असा परिवार. उपजीविकेचे कोणतेच साधन नसल्याने आई लक्ष्मी या परिसरातील लोकांची धुणी-भांडी कऊन मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर तिघींचा उदरनिर्वाह सुरू होता. मेटाचा मार्ग येथे रहाणाऱ्या लोहार कुटुंबावर संकटाचे घाव सुरूच होते. पती नारायण, मुलगा गोविंद यांच्या निधनाच्या दु:खातून सावरत असताना अचानक राहते घर कोसळले.
भाड्याच्या घरात राहण्याशिवाय पर्याय त्यांना नव्हता. खर्चात झालेली वाढ, येणाऱ्या उत्पन्नाचा विचार करता लोहार कुटुंबाची ओढाताण सुरू झाली. ही सारी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख आणि बांधकाम व्यावसायिक संतोष यांना समजली. त्यांनी मित्राचे पडलेले घर पाहून यावर्षी 18 जानेवारीला स्वत:चा होणारा वाढदिवस रद्द केला. वाढदिवसाचा खर्च टाळत मित्र गोविंदाचे घर उभारण्याचा संकल्प केला. सुमारे दीड-दोन लाख खर्चून शौचालयासह त्यांनी चार महिन्यातच घर उभाऊन सासू-सुनेच्या डोक्यावर छप्पर उभारले.
या घराच्या चाव्या बुधवारी गडहिंग्लच्या दौऱ्यावर आलेले खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, विजय देवणेंच्या हस्ते लक्ष्मी लोहार यांच्याकडे सुपुर्द केल्या. खुद्द शाहू छत्रपत महाराज घरी आल्याने लक्ष्मी, मधुरा यांना अश्रू अनावर झाले. पदर डोळ्याला लावत दानशुरांनी दिलेल्या घराच्या चाव्या घेत कृतज्ञता व्यक्त केली. अनोखा वाढदिवस साजरा करण्याच्या संकल्पाबद्दल समाधान व्यक्त केले. अनाठायी खर्चाला फाटा देत वाढदिवसाची आठवण म्हणून गरजूला मदत करत डोक्यावर छप्पर देणाऱ्या संतोष यांच्या या कामाचे कौतुक करताना अजूनही माणुसकी शिल्लक असल्याची जाणीव झाली.