विचित्र बायोप्सीपासून होणार सुटका
फ्लेवरयुक्त लॉलिपॉप करणार निदान
अनेकदा कर्करोगाची तपासणीच रुग्णासाठी त्रासदायक असते. अशाचप्रकारची एक तपासणी तोंडाच्या कर्करोगासाठी केली जाणारी बायोप्सी असून यात रुग्णाच्या तोंडात कॅमेरा सोडला जातो आणि छायाचित्रे मिळवून त्याला कर्करोग आहे की नाही हे पाहिले जाते. जर कर्करोग असेल तर तो कुठल्या स्टेजचा आहे हे पाहण्यात येते. परंतु वैज्ञानिक आता एका नव्या तंत्रज्ञानावर काम करत असून यात स्वादिष्ट लॉलीपॉपच सर्व माहिती देऊ शकणार आहे.
बायोप्सी अत्यंत प्रभावी असते, परंतु ती वेदनादायी आणि अधिक वेळ घेणारी असते. दुसरीकडे लॉलिपॉपयुक्त तंत्रज्ञान एक सौम्य पद्धत आणि उत्तम पर्याय सादर करणार आहे. या तंत्रज्ञानावर युनिव्हर्सिटी ऑफ बर्गिंघमचे वैज्ञानिक काम करत आहेत. या लॉलीपॉपमध्ये स्मार्ट हायड्रोजेल सारख्या पदार्थाचा वापर केला जाणार आहे. रुग्ण जेव्हा लॉलिपॉत तोंडात धरतील, तेव्हा त्याच्यावर रुग्णाची लाळ लागणार आहे. हायड्रोजेल एक प्रकारच्या आण्विक जेलीसारखे काम करणार असून यात लाळ आणि कॅन्सरच्या बायोमेकरचे काम करणारे प्रोटीन्स अडकणार आहेत. नंतर हे अडकलेले प्रोटीन्स लॅबमध्ये हायड्रोजेलपासून वेगळे करत त्यांची तपासणी केली जाणार आहे. बर्मिंघम युनिव्हर्सिटीत बायोसेंसर्सच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. रुची गुप्ता यांना हा प्रकल्प यशस्वी होणार असल्याचा पूर्ण विश्वास आहे. या प्रकल्पाच्या पुढील टप्प्यावर सध्या काम सुरू आहे.
या प्रोजेक्टला कॅन्सर रिसर्च युके आणि इंजिनियरिंग अँड फिजिक्स सायन्स रिसर्च कौन्सिलकडून सुमारे 3 कोटी 69 लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. सध्या संशोधक लॉलिपॉपसाठी योग्य फ्लेवरच्या शोधात आहेत. वर्तमान तपासणी पद्धतींमध्ये होणाऱ्या त्रासापासून हे तंत्रज्ञान मुक्तता मिळवून देण्यास यशस्वी ठरणार असल्याचे संशोधकांचे सांगणे आहे.
हे तंत्रज्ञान तोंडाच्या कॅन्सरचे निदान करण्यासाठी कमी त्रासदायक आणि अधिक सुविधाजनक आहे. कारण याच्या विकसित करण्याचा उद्देशच मूळी हाच आहे. याचबरोबर याच्या निष्कर्षांमध्ये अधिक अचूकता दिसून येणार आहे. तसेच कॅन्सरच्या देखरेखीच्या दिशेने रुग्णांचा त्रास कमी होणार आहे.