‘स्कायवर्ल्ड’ अकॅडमीद्वारे एव्हिएशन प्रशिक्षण
विनोद बामणे यांची माहिती : अकॅडमीद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार
प्रतिनिधी/ बेळगाव
एव्हिएशन, टूर अँड ट्रॅव्हल, रिटेल आणि हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रांसाठी बेळगावमध्ये स्कायवर्ल्ड अकॅडमीचे उद्घाटन करण्यात आले आहे. गोंधळी गल्ली कॉर्नर येथे स्कायवर्ल्ड अकॅडमीचे कार्यालय स्थापन करण्यात आले असून याद्वारे करिअर प्रशिक्षण तसेच कौशल्य विकास केला जाणार आहे. शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एव्हिएशन क्षेत्रात संधी मिळवून देण्यासाठी अकॅडमी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास स्कायवर्ल्ड अकॅडमीचे सीईओ विनोद बामणे यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
पंचवीस वर्षांपासून एव्हिएशन क्षेत्रात काम करणाऱ्या विनोद बामणे यांनी नव्याने स्कायवर्ल्ड अकॅडमी सुरू केली आहे. बेळगाव तसेच परिसरातील युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी ही अकॅडमी सुरू केली आहे. केवळ बेळगावच नाही तर कर्नाटक, महाराष्ट्र, गोवासह इतर राज्यांमध्येही स्कायवर्ल्डच्या शाखा लवकरच सुरू करण्याचा मानस असल्याचे कृष्णन अय्यर यांनी स्पष्ट केले.
एव्हिएशन क्षेत्रात झपाट्याने बदल होत असून टू टायर, थ्री टायर शहरांमध्ये विमानतळांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भविष्यात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता भासणार असल्याने एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात कमालीची वाढ होणार आहे. त्यामुळे बेळगावच्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे एव्हिएशन तज्ञ फॅबियन परेरा यांनी सांगितले. यावेळी स्कायवर्ल्डमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी अनुभव कथन केले.