राज्यात सरासरी 60 टक्के मतदान
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला : तरुणाईचा उत्साह : 23 रोजी निकाल
प्रतिनिधी, / मुंबई
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या प्रमुख पक्षांमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिली आणि राज्याच्या इतिहासातील पंधराव्या विधानसभेसाठी निवडणूक झाली. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीकडे राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागलेले आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती, तर दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व काँग्रेस यांची महाविकास आघाडी या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये प्रामुख्याने ही निवडणूक झाली.
राज्यात विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी झालेल्या मतदानात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून 4,136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून 60 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले आहे. यात तरुणाईचा उत्साह वाखाणण्याजोगा राहिला होता. मतदानानंतर जाहीर होणाऱ्या एक्झिट पोलनुसार पुन्हा महायुतीची सत्ता येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तर दुस्रया एका एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काँटे की टक्कर होणार आहे. याबाबतचे चित्र 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार हे निश्चित आहे.
156 पक्षांसह 4 हजारांहून अधिक उमेदवार
विधानसभेच्या 288 जागांसाठी आज झालेल्या मतदानासाठी 156 पक्ष आणि 4 हजार 136 उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे भवितव्य आत ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. शुक्रवारी मशीन खोलल्या जातील आणि खुल जा सीम सीम याप्रमाणे एक एक निकाल बाहेर पडू लागलीत. महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना झाला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.
अहमदनगर - 61.95टक्के, अकोला - 56.16 टक्के, अमरावती -58.48 टक्के, औरंगाबाद- 60.83 टक्के, बीड - 60.62 टक्के, भंडारा- 65.88 टक्के, बुलढाणा-62.84 टक्के, चंद्रपूर- 64.48 टक्के, धुळे - 59.75 टक्के, गडचिरोली-69.63 टक्के, गोंदिया -65.09 टक्के, हिंगोली - 61.18 टक्के, जळगाव - 54.69 टक्के, जालना- 64.17 टक्के, कोल्हापूर- 67.97 टक्के, लातूर - 61.43 टक्के, मुंबई शहर- 49.07 टक्के, मुंबई उपनगर-51.76 टक्के, नागपूर - 56.06 टक्के, नांदेड - 55.88 टक्के, नंदुरबार- 63.72 टक्के, नाशिक -59.85 टक्के, उस्मानाबाद- 58.59 टक्के, पालघर- 59.31 टक्के, परभणी- 62.73 टक्के, पुणे - 54.09 टक्के, रायगड - 61.01 टक्के, रत्नागिरी- 60.35 टक्के, सांगली - 63.28 टक्के, सातारा - 64.16 टक्के, सिंधुदुर्ग - 62.06 टक्के, सोलापूर -57.09 टक्के, ठाणे - 49.76 टक्के, वर्धा - 63.50 टक्के, वाशिम -57.42 टक्के, यवतमाळ - 61.22 टक्के मतदान झाले आहे.
या मतदार संघांकडे राज्यासह देशाचे लक्ष
बारामती, इंदापूर, दौंड, नांदेड येवला, कवठे-महांकाळ, माहिम, वरळी, कराड दक्षिण, कोल्हापूर उत्तर, परळी या मतदारसंघातील लढतींकडे सगळ्यां चे लक्ष आहे.